माळखांबी ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 15 वर्षांनंतर सत्तांतर ! मिळाली जुन्यांना विश्रांती व नव्यांना संधी 

अशोक पवार 
Wednesday, 20 January 2021

माळखांबी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोहिते - पाटील प्रणीत माजी उपसरपंच प्रभाकर गमे - पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचे नऊपैकी आठ उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. तब्बल 15 वर्षे दोन गटांकडे असलेली सत्ता यंदा गमे - पाटील गटाने खेचून आणली आहे. येथील निवडणुकीत यंदा मतदारांनी उच्च शिक्षित व तरुण उमेदवारांना चांगला कौल दिला आहे. 

वेळापूर (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र परिवर्तनाचे वारे वाहत असून, "जुन्यांना विश्रांती आणि नव्याना संधी' असा एक ट्रेंड सर्वत्र पाहावयास मिळत आहे. याला माळखांबी (ता. माळशिरस) हे गाव देखील अपवाद नाही. माळखांबी ग्रामस्थांनी यंदा आठ विरुद्ध एक अशा बहुमतांनी परिवर्तन करत परिवर्तन ग्रामविकास पॅनेलकडे सत्ता दिली आहे. 

माळखांबी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोहिते - पाटील प्रणीत माजी उपसरपंच प्रभाकर गमे - पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचे नऊपैकी आठ उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. तब्बल 15 वर्षे दोन गटांकडे असलेली सत्ता यंदा गमे - पाटील गटाने खेचून आणली आहे. येथील निवडणुकीत यंदा मतदारांनी उच्च शिक्षित व तरुण उमेदवारांना चांगला कौल दिला आहे. नऊ सदस्य संख्या असलेली येथील ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी झाली. पंधरा वर्षांपैकी पहिली सलग दहा वर्षे राजकुमार पाटील प्रणीत भाजपचे महादेव कोडग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत होती, तर पुढील पाच वर्षे विजयकुमार शेळके - पाटील यांच्या गटाची सत्ता होती. पंधरा वर्षे असणारी दोन्ही विरोधकांची सत्ता या विजयानंतर पायउतार झाली आहे. 

या निवडणुकीत महादेव कोडग यांच्या गटाचा एक उमेदवार विजयी झाला तर मावळत्या सत्ताधाऱ्यांच्या शेळके - पाटील गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. माळखांबीमध्ये तब्बल 15 वर्षांनंतर झालेले सत्ता परिवर्तन अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. येथील मतदारांनी मोठ्या अपेक्षेने उच्च शिक्षित उमेदवारांना या निवडणुकीमध्ये निवडून दिले आहे. या उमेदवारांकडून गावाच्या विकासाची मोठी अपेक्षा आहे. निवडणुकीसाठी नऊ उमेदवार जरी असले तरी यांच्या पाठीमागे प्रचार आणि इतर गोष्टींसाठी अहोरात्र कष्ट घेणारे शेकडो हात आहेत. यामध्ये प्रमुख्याने धनंजय पाटील, प्रशांत पाटील, विजयकुमार पाटील, तानाजी गमे, नंदकुमार पाटील, राज पाटील, दत्ता गमे आदींचा समावेश आहे. 

पॅनेल प्रमुख प्रभाकर गमे - पाटील म्हणाले, की गावाचे प्रश्न सोडवणे, शासकीय योजना सर्व समाजापर्यंत पोचवणे, सर्व समाजाला न्याय मिळावा, जनतेच्या जिव्हाळ्याची मूलभूत कामे मार्गी लावणे हेच आमच्या विजयी पॅनेलचे व्हीजन आहे. ग्रामपंचायत जनतेसाठी आहे, पुढाऱ्यांसाठी नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे. 

विजयी उमेदवार 
प्रभाकर गणपत गमे - पाटील, रोहिणी लहू पाटील, मंगल संतोष पुजारी, अनिल राजाराम निंबाळकर, प्रतिभा दयानंद शेळके, बाळासाहेब महादेव वाघमारे, संजय गुलाब साठे, ज्योती चंद्रकांत सरतापे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Malkhambi Gram Panchayat after fifteen years of independence the youth group won