सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मळोलीकर शिक्षकांचाही "खारीचा वाटा'

अशोक पवार 
Monday, 28 September 2020

नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांची तातडीची गरज म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मळोली आणि भांगिरा माळ (मळोली, ता. माळशिरस) या शाळांतील शिक्षकांनी सुमारे 20 हजार रुपयांचा रोख मदत निधी आपत्ती व्यवस्थापन समिती, मळोली यांच्याकडे सुपूर्द केला. 

वेळापूर (सोलापूर) : नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांची तातडीची गरज म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मळोली आणि भांगिरा माळ (मळोली, ता. माळशिरस) या शाळांतील शिक्षकांनी सुमारे 20 हजार रुपयांचा रोख मदत निधी आपत्ती व्यवस्थापन समिती, मळोली यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव, मळोली गावचे सरपंच गणेशराव जाधव-पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. 

शाळेच्या रचनात्मक कामात धावून येणारे ग्रामस्थ आणि ग्रामस्थांवरील अभूतपूर्व आपत्तीमध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे प्राथमिक शिक्षक हे दृश्‍य संकट काळातही समाधान देणारे आहे, असे प्रतिपादन करून आपत्ती व्यवस्थापन समितीस योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल समितीतर्फे रणजितसिंह जाधव यांनी शिक्षकांचे कौतुक केले. 

18 सप्टेंबरच्या रात्री पिलीव, शिंगोंर्णी, कुसमोड, मळोली गावच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मळोली गावच्या ओढ्याला आलेल्या महापुरात ओढ्याकाठच्या लोकांचे अतोनात नुकसान होऊन वीस घरे, जीवनावश्‍यक वस्तू, धान्य आणि संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. शेतीचेही खूप मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या कामात मळोली शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर करांडे, शाळेतील कार्यरत शिक्षक नानासाहेब जाधव, अभिजित शेळवणे, नीता मोहिते-जाधव, स्वाती कळसुले-जाधव, रेश्‍मा खान, आशा भारती, शाळेच्या माजी शिक्षिका वंदना देशमुख-चव्हाण, भांगिरा माळ (मळोली) शाळेचे मुख्याध्यापक हरी शिंदे यांनी योगदान दिले. तसेच व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्यातर्फे एकूण चाळीस कुटुंबांना संसारोपयोगी किटचे वाटप करण्यात आले.

शिक्षकांच्या या योगदानामुळे पूरग्रस्तांचे सर्वस्व नक्कीच परत मिळणार नाही, परंतु सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना मानवतेतून पुढे आलेला "खारीचा वाटा' तात्पुरता आधार मात्र नक्की बनणार आहे, अशा भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malolikar teachers provided financial assistance to flood victims