मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागल्यास सर्वांत पुढे मी असेन : आमदार राम सातपुते 

शशिकांत कडबाने 
Monday, 21 September 2020

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास अकलूज व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व बंद शांततेने पाळण्यात आला. 

अकलूज (सोलापूर) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास अकलूज व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व बंद शांततेने पाळण्यात आला. 

अकलूज येथील जय शंकर उद्यान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आमदार राम सातपुते यांना देण्यात आले. या वेळी सरपंच शिवतेजसिंह मोहिते - पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका विशद केली. तसेच शाहीर राजेंद्र कांबळे, शेखर खिलारे, श्रीनिवास कदम पाटील, प्रिया नागणे, धनंजय साखळकर, नानासाहेब वरकड, नागेश काकडे, लक्ष्मणराव आसबे आदींनी मनोगते व्यक्त केली. या वेळी वीरशैव लिंगायत समाज, दलित महासंघ, युवा सेना, योद्धा प्रतिष्ठान, विश्वकर्मा युवक संघटना आदी संघटनांच्या वतीने मराठा आरक्षणास पाठिंब्याची पत्रे देण्यात आली. प्रास्ताविक उत्तमराव माने शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निनाद पाटील यांनी केले. 

या वेळी आमदार राम सातपुते यांनी, मराठा समाजाच्या आरक्षणास कोर्टाने दिलेली स्थगिती त्वरित उठवण्यात यावी व आरक्षण लागू करावे यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तालुक्‍याचा आमदार म्हणून मी सर्वात पुढे असेन, अशी ग्वाही दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Malshiras taluka the Maratha reservation movement got spontaneous response