नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याची वन विभागाने मागितली परवानगी ! मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 15 लाखांची मदत

तात्या लांडगे
Sunday, 6 December 2020

प्रत्येकी पाच लाखांची सुपूर्द केली मदत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 15 लाखांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी पाच लाखांची मदत धनादेशाद्वारे दिली असून उर्वरित रक्‍कम बॅंकेत फिक्‍स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील. नागरिकांनी बिबट्याला पकडेपर्यंत सावधानता बाळगावी.
- धैर्यशिल पाटील, उपवनसंरक्षक, सोलापूर

सोलापूर : नरभक्षक बिबट्या बीड- नगरमार्गे करमाळ्यात (अंजनडोह) आला आहे. आता तो दक्षिणेकडे सात ते दहा किलोमीटरपर्यंत जावू शकतो, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून वन विभाग व पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती केली आहेत. परिसरात कॅमेरे, सीसीटिव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

 

उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील म्हणाले...

 • नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आठ पथकांची नियुक्‍ती
 • बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी परिसरात लावले 25 कॅमेरे
 • करमाळा परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले 15 ठिकाणी पिंजरे
 • अंजनडोहपासून बिबट्या दक्षिला सात ते दहा किलोमीटरपर्यंत जावू शकतो
 • गावोगावी दिली जातेय दवंडी; आमदार संजय शिंदे, तहसिलदार व पोलिस प्रशासनाची घेतली जातेय मदत
 • मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी 15 लाखांची मदत

 

नरभक्षक बिबट्या बीड, नगर जिल्ह्यात हल्ले करुन आता तो सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात पोहचला आहे. बिबट्याने केलेल्या पहिल्या हल्ल्यात 3 डिसेंबर रोजी लिमयेवाडी (ता. करमाळा) येथील 40 वर्षीय कल्याण देविदास फुंदे यांचा मृत्यू झाला. तर 5 डिसेंबरला केलेल्या दुसऱ्या हल्ल्यात अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे या 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नरभक्षक बिबट्याचे वास्तव्य त्याठिकाणी असल्याने त्याचे हल्लेही वाढू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बिबट्याला गोळ्या घालून ठार करा, अशी मागणी आमदार संजय शिंदे यांनी केली. त्यानुसार गोळ्या घालून बिबट्याला ठार करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र सोलापूर वन विभागाने नागपूर वन परिक्षेत्र कार्यालयास पाठविले आहे. तुर्तास बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी गनची व्यवस्था केल्याचेही उपवनसरंक्षक धैर्यशिल पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी...

 • बिबट्या दिसल्यास तिथूनच मागे फिरा; अंधारात मुलांना एकटे सोडू नका
 • कामानिमित्त अंधारातून एकटे जाताना मोबाईलमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवा
 • रात्री शेतात जाताना सोबत कंदील, बॅटरी, दणकट काठी, पाळीव कुत्रा, शिट्टी जवळ ठेवा
 • जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवून त्याठिकाणी लाईटची सोय करावी
 • गाव स्वच्छ ठेवल्यास मोकाट जनावरांची संख्या कमी होऊन तिकडे बिबट्या येणार नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man-eating leopard asked for permission to shoot! 15 lakh each to the relatives of the deceased