मंदिरे सुरु करण्याच्या निर्णयावरुन श्रेय्यवाद ! 'वंचित'ने फोडले फटाके तर 'मनसे'ने वाटले पेढे

तात्या लांडगे
Saturday, 14 November 2020

वंचित बहूजन आघाडीने सोलापुरात पेढे वाटप करीत फटाके फोडले. यावेळी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे म्हणाले, वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात मोठे आंदोलन पार पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या प्रयत्नातूनच मंदिरे उघडली म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.

सोलापूर : पाडव्यापासून मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काहीवेळापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याचा निर्णय घोषीत केला. त्यानंतर भक्‍त आंनदोत्सव साजरा करता असतानाच या निर्णयावरून आता राजकीय श्रेय्यवाद सुरु झाला आहे. वंचित बहूजन आघाडीने सोलापुरात पेढे वाटप करीत फटाके फोडले. यावेळी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे म्हणाले, वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात मोठे आंदोलन पार पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या प्रयत्नातूनच मंदिरे उघडली म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्यापासून मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार राज्यातील सर्व मंदिरे, मस्जिद यासह अन्य धार्मिक स्थळे उघडली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर मंदिर परिसरात व पंढरपुरात आंदोलन केले होते. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागणीला यश मिळाले म्हणून वंचित बहूजन आघाडीने श्री सिध्देश्‍वर मंदिर परिसरात आंनदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, शहराध्यक्ष गणेश पुजारी, कोषाध्यक्ष बबन शिंदे, महाराष्ट्र राज्य महिला सदस्या अंजनाताई गायकवाड, रवी थोरात, शिवाजी बनसोडे, सुहास सावंत, भिमा मस्के, करण वाढवे, बाबा गायकवाड, सुरज मस्के, सुजाता वाघमारे आदी उपस्थित होते.

राज साहेबांमुळेच उघडली मंदिरे 
राज्यातील संतांचे वंशज, महाराजमंडळींनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात सरकारकडे मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी काही महाराजमंडळी मुंबईत कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी पुढील दोन दिवसांत सरकार याबद्दल सकारात्मक निर्णय जाहीर करेल, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी त्यांना दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास मान्यता दिली. राज साहेबांची मागणी सरकारने पूर्ण केल्याबद्दल पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manase and vanchit bahujan aaghadi two parties ekjoy this decision to starts temples