esakal | नंदीध्वज पूजेवरुन मानकरी- माजी नगरसेवकांमध्ये वाद ! यात्रेच्या निर्णयासाठी बैठक नाही, आता अंतिम निर्णयच
sakal

बोलून बातमी शोधा

4gadda_20yatra_20fb.jpg

यात्रेचे नियोजित कार्यक्रम

 • 10 जानेवारी : मानकरी शेटे वाड्यात योगदंडाची पूजा
 • 12 जानेवारी : 68 लिंगांना तैलाभिषेक
 • 13 जानेवारी : अक्षता सोहळा
 • 14 जानेवारी : हिरेहब्बू यांच्या घरातून नंदीध्वज प्रस्थान, होमहवन
 • 15 जानेवारी : पारंपारिक विधीसाठी नंदीध्वज होम मैदानावर
 • 16 जानेवारी : मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळ्ळी

नंदीध्वज पूजेवरुन मानकरी- माजी नगरसेवकांमध्ये वाद ! यात्रेच्या निर्णयासाठी बैठक नाही, आता अंतिम निर्णयच

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेसंबंधी पंच कमिटीचा प्रस्ताव, लोकप्रतिनिधींची मागणी आणि महापालिका व पोलिस प्रशासनाचा अभिप्राय, याचा विचार करुन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्‍तांना प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे आता कोणतीही बैठक होणार नसून, विभागीय आयुक्‍तच यात्रेबाबत अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिले.

यात्रेचे नियोजित कार्यक्रम

 • 10 जानेवारी : मानकरी शेटे वाड्यात योगदंडाची पूजा
 • 12 जानेवारी : 68 लिंगांना तैलाभिषेक
 • 13 जानेवारी : अक्षता सोहळा
 • 14 जानेवारी : हिरेहब्बू यांच्या घरातून नंदीध्वज प्रस्थान, होमहवन
 • 15 जानेवारी : पारंपारिक विधीसाठी नंदीध्वज होम मैदानावर
 • 16 जानेवारी : मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळ्ळी

श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेस 10 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. 13 जानेवारीला मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा पार पडणार आहे. मात्र, शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नसून, नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमधील मृत्यूदर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यात्रेसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे दोन ते तीन लाखांपर्यंत भाविक दरवर्षी दर्शनासाठी सोलापुरात येतात. या पार्श्‍वभूमीवर यात्रेतील धार्मिक विधीसाठी मानकऱ्यांशिवाय अन्य कोणालाही परवानगी नसावी, मानाचे सात नंदीध्वज थेट अक्षता सोहळ्याच्या ठिकाणी वाहनातून आणले जातील, अशा स्वरुपाचा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे पाठविण्यात आला आहे. आता विभागीय आयुक्‍त यात्रेबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नंदीध्वज पूजेवरुन मानकरी अन्‌ माजी नगरसेवकांमध्ये वाद
माजी नगरसेवक जगदिश पाटील यांनी शिवगंगा मंदिर परिसरातील त्यांच्या घरी मानकऱ्यांचा परवाना न घेता नंदीध्वज पूजेसाठी आणले होते. यावरुन प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू व पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला. यात दोघेही हमरीतुमरीवर येण्याबरोबरच एकेरी भाषेचाही वापर केला. दरम्यान हिरेहब्बू यांनी कोणालाही मी परवानगी दिली नसताना तुम्ही नंदीध्वजाची पूजा कशी केली, असा सवाल उपस्थित केला. तेव्हा पाटील यांनी मी सिद्धरामेश्‍वरांचा भक्‍त आहे. मला अधिकार आहे, असे म्हणत यात्रा करायची नाही, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित केला. दरम्यान, यात्रा करण्यासाठी माझी धडपड सुरु आहे. यासाठी प्रशासनाकडे मी वारंवार मागणी करत आहे. आतापर्यंत फक्‍त 18 नंदीध्वजधारकांना सरावासाठी परवानगी दिली. इतरांना परवाना दिला नाही. प्रशासनाने नंदीध्वजधारक, भक्‍तांसह, पंच कमिटी असे मिळून 300 ते 350 जणांना परवानगी दिल्यास यात्रा सहा तासात पूर्ण करतो. ना वाजंत्री, ना डामडौल असणार आहे. थेट हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वज व पालख्या मंदिरात आणण्याचे माझे नियोजन आहे, असे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.