होम डिलिव्हरीची हाऊस फिटली; कारण तर वाचा...

प्रमोद बोडके
मंगळवार, 23 जून 2020

कोरोना संकटाच्या काळात अनेक नवनवीन किस्से समोर येऊ लागले आहेत. कोरोनामुळे प्रेमी युगुलांवर ज्या पध्दतीने सर्वच मार्गानी गंडांतर आले. तशीच काहीशी पंचाईत तळिरामांची झाली आहे. दारूच्या होम डिलिव्हरीमुळे लपून- छपून दारु पिणाऱ्याची गोची झाली आहे.

सोलापूर : कोरोना संकटाच्या काळात अनेक नवनवीन किस्से समोर येऊ लागले आहेत. कोरोनामुळे प्रेमी युगुलांवर ज्या पध्दतीने सर्वच मार्गानी गंडांतर आले. तशीच काहीशी पंचाईत तळिरामांची झाली आहे. दारूच्या होम डिलिव्हरीमुळे लपून- छपून दारु पिणाऱ्याची गोची झाली आहे. घरच्या समोर त्याचे गुपित फुटण्याची शक्यता असल्याने अनेक ग्राहक मद्याची ऑर्डर करतात परंतु घरात मद्याची डिलिव्हरी घेण्यास टाळू लागले आहेत. त्यामुळे सोलापुरातील डिलिव्हरी बॉय आणि मद्य विक्रेते यांच्यावर सध्या भलतेच संकट ओढवले आहे. होम डिलिव्हरीची हाउस फिटली, घरच्यासमोर नको दारुची बाटली अशा बिकट स्थितीचा सोलापुरातील तळिराम, डिलिव्हरी बॉय आणि मद्य विक्रेत्यांना सामना करावा लागत आहे. 
कोरोनाला रोखण्यासाठी जवळपास दोन महिने मद्य विक्री बंद करण्यात आली होती. राज्यातील महसुलात वाढ व्हावी, मद्य  विक्रीतून मिळणारी माया राज्याच्या तिजोरीत यावी यासाठी सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करून राज्यात घरपोच मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आठ दिवसापूर्वी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मद्य विक्रीला सुरुवात झाली. सोलापूर शहरातील मद्य विक्रेत्यांना आता विचित्र समस्या सतावू लागली आहे. लोक मद्य खरेदीची ऑर्डर देतात परंतु डिलिव्हरीसाठी त्याच्या घरी गेल्यानंतर सर्वांसमोर दारूची बाटली नको म्हणतात. 

सोलापूरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
डिलिव्हरी बॉयला इतर ठिकाणी ऑर्डर देण्यास सांगतात. त्यामुळे घरपोच मद्य विक्रीच्या नियमांचा भंग होतो आणि डिलिव्हरी बॉयला पोलिस दंड करतात अशी तक्रारच सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेत्यांनी सोलापूरचे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. मद्य विक्रेत्यांच्या या  तक्रारीमुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांनीही डोक्याला हात लावला असून या प्रकरणी काय तोडगा काढायचा? याबाबत इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन यातून कसा तोडगा काढणार? याकडेच मद्य विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे. घरपोच मद्यविक्री देत असताना त्या ग्राहकाला घराचा पत्ता द्यावा लागत आहे. दारू घेऊन डिलिव्हरी बॉय घरी आल्यानंतर तो ग्राहक चार चौघांसमोर दारू घेण्यासाठी संकोचत असल्याने त्याचा नाहक त्रास डिलिव्हरी बॉयला सहन करावा लागत आहे. तुम्ही घराजवळ येऊ नका, बाहेरच थांबा,  आमच्या घरी महिला व  लहान मुले आहेत. तुम्ही मला रोडवर डिलिव्हरी द्या अशा नवीन क्लुप्त्या मद्य खरेदी करणारे ग्राहक लढवत आहेत. हैराण झालेल्या डिलिव्हरी बॉयने मद्य विक्रेत्यांकडे याबाबतची तक्रार केली आहे. डिलिव्हरी बॉयने रस्त्यावर किंवा आडबाजूला जाऊन मद्याची डिलिव्हरी दिल्यास त्याला पोलिस व इतर लोक त्रास देत असल्याने मद्य विक्रेत्यांची नवीन डोकेदुखी वाढली आहे. शासनाने ज्या उद्देशाने मद्यविक्रीला परवानगी दिली आहे तो उद्देश सफल होताना दिसत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन करू परंतु आम्हाला दुकानातच काउंटर सेलद्वारे मद्य विक्री करण्यास परवानगी द्या अशी मागणीच आता  सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रीते संघटनेने केली आहे. संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमेश क्षीरसागर यांनी या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तब्बल अडीच महिने सोलापुरात बंद असलेली मद्य विक्री गेल्या आठवड्यात सुरू झाली. त्यामुळे मद्य विक्रेत्यांना व तळीरामांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता मद्य  विक्रीतून भलतेच संकट समोर आल्याने यातून मार्ग कसा काढायचा? असाच प्रश्न तळीराम, डिलिव्हरी बॉय व मद्य विक्रेत्यांना पडला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर यातून काय तोडगा काढतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ग्राहकांच्या भावनाचा उद्रेक...
सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सोमेश क्षीरसागर म्हणाले, घरपोच मद्य विक्रीसाठी आम्हाला दिवसाला एक हजार ते बाराशे ऑर्डर व्हाट्सअप वर फोनद्वारे येत आहेत. आम्ही दिवसाला जास्तीतजास्त दोनशे लोकांनाच घरपोच मद्य  विक्री करु शकत आहे. अनेक ग्राहकांच्या ऑर्डर वेटिंगवर येतात. त्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आम्हाला दोन-तीन दिवस लागतात. ऑर्डर देऊनही मद्य मिळत नसल्याने ग्राहकांच्या भावनांचा उद्रेक होतो. ते लोक आमच्याशी हुज्जत घालतात. अशा अनेक अडचणींना डिलिव्हरी बॉय व मद्य विक्रेत्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला काउंटर सेलद्वारे मद्य विक्री करण्यास परवानगी द्यावी. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many difficulties in ordering home delivery of wine in Solapur