जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख, तरीही बहुतांश गावांमध्ये शिवसेनेचेच दोन पॅनेल 

तात्या लांगडे 
Thursday, 14 January 2021

जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या सुरू असून 15 जानेवारीला (शुक्रवारी) मतदान होणार आहे. सबंध जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असून त्यांच्याकडे मतदारसंघ वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार गणेश वानकर यांच्याकडे मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी आणि मंगळवेढा या चार तालुक्‍यांची जबाबदारी आहे. या चार तालुक्‍यांतील 215 ग्रामपंचायतींची आता निवडणूक होत असून त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत प्रचार केला आहे. 

सोलापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच प्रमुख लढती आहेत. काही गावांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पॅनेल तयार केले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असून त्यांच्यावर ग्रामपंचायत निवडणुकीची धुरा सोपविण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडी असतानाही तिन्ही पक्षांतील नेते सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याकडेच असतील, असा दावा करू लागले आहेत. 

जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या सुरू असून 15 जानेवारीला (शुक्रवारी) मतदान होणार आहे. सबंध जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असून त्यांच्याकडे मतदारसंघ वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार गणेश वानकर यांच्याकडे मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी आणि मंगळवेढा या चार तालुक्‍यांची जबाबदारी आहे. या चार तालुक्‍यांतील 215 ग्रामपंचायतींची आता निवडणूक होत असून त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत प्रचार केला आहे. तर धनंजय डिकोळे यांच्याकडे करमाळा व माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असून या दोन्ही मतदारसंघात 133 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. संभाजी शिंदे यांच्याकडे पंढरपूर, सांगोला, माळशिरस या तालुक्‍यांची जबाबदारी असून या मतदारसंघातील 190 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. पुरुषोत्तम बरडे यांच्याकडील अक्‍कलकोट व दक्षिण सोलापुरातील 120 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. प्रत्येक जिल्हाप्रमुखांनी आपापल्या मतदारसंघात, तालुक्‍यात प्रचार केला असून बहुतांश सदस्य बिनविरोध झाले आहेत. 

विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे लक्ष 
भाजपसोबत युती असताना शिवसेनेकडे शहर मध्य, बार्शी, करमाळा, मोहोळ, सांगोला, माढा हे मतदारसंघ होते. तरीही दक्षिण सोलापूर, पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असल्याचेही दिसून आले. मात्र, माळशिरस, माढा, अक्कलकोट या तीन तालुक्‍यांत शिवसेनेला म्हणावे तितके यश मिळू शकलेले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ताकद वाढविण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत सर्वाधिक ताकदवान विधानसभा सदस्य आपल्याला मिळावेत, यादृष्टीने चारही जिल्हाप्रमुखांनी प्रचार केला आहे. 

कोंडी येथे उपजिल्हाप्रमुख अन्‌ तालुकाप्रमुखच विरोधात 
कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे आणि तालुकाप्रमुख शहाजी भोसले यांनी परस्परविरोधात स्वतंत्र पॅनेल उभे केले आहेत. कोणाचीही सत्ता आली, तरी शिवसेनेचीच असणार असा विश्‍वास जिल्हाप्रमुख गणेश वानकर व्यक्‍त करीत आहेत. अनेक गावांमध्ये दुरंगी लढत पाहायला मिळत असून विशेषत: दोन्ही बाजूचे पॅनेल शिवसेनेचेच असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तर काही गावांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. सरंपच कोणाचा? यावरून अनेक गावांमधील निवडणुका बिनविरोध झाल्या नसल्याच्याही चर्चा आहेत. आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची एकी होणार का? याची उत्सुकता लागली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In many villages two Shiv Sena panels are contesting against each other