मराठा क्रांती मोर्चा : पानगावात काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध

संतोष कानगुडे
Monday, 21 September 2020

मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर राज्यभर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात झाली असून, पानगाव (ता. बार्शी) येथेही सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पानगाव बंद ठेवत काळे झेंडे दाखवत शासनाचा निषेध करण्यात आला. 

पानगाव (सोलापूर) : मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर राज्यभर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात झाली असून, पानगाव (ता. बार्शी) येथेही सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पानगाव बंद ठेवत काळे झेंडे दाखवत शासनाचा निषेध करण्यात आला. 

ग्रामपंचायतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या आंदोलनाची सुरवात करण्यात आली. मराठा आरक्षणा संदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत, यासाठी समाजातील काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण व शासनाकडून होणारे प्रयत्न यावर विविध मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली. अशा परस्थितीत शासन आपली भूमिका योग्यपणे पार पाडत नसेल तर त्यांना खडबडून जागे करण्यासाठी मराठा समाजाला यापेक्षा वेगळ्या पद्धतीची आंदोलने करावी लागतील, असे मत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मांडण्यात आले. 

सकाळपासून गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवत ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. गावातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्या होत्या. "एक मराठा लाख मराठा' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, आंदोलनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बार्शी तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha protested against the government by displaying black flags in Pangaon