मंगळवेढ्यात मराठा आंदोलकांनी रास्ता राको करून केला सरकारचा निषेध 

हुकूम मुलाणी 
Monday, 21 September 2020

उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीचे आरक्षण रद्द केल्याने सकल मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला. आज मंगळवेढ्यात व्यापाऱ्यांनीही दुकाने ठेवत कडकडीत बंद पाळला. शहरात पूर्णपणे शुकशुकाट होता. 

मंगळवेढा (सोलापूर) : उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीचे आरक्षण रद्द केल्याने सकल मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला. आज मंगळवेढ्यात व्यापाऱ्यांनीही दुकाने ठेवत कडकडीत बंद पाळला. शहरात पूर्णपणे शुकशुकाट होता. 

बंद करण्यापूर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना दिले. शहरात येणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर दामाजी चौकात सरकार विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. आरक्षणासाठी यापूर्वी 58 मूकमोर्चे, दोन ठोक मोर्चे व 42 बांधवांचे बळी गेल्यावर मागच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु आताच्या ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. हे राज्य सरकार आपली बाजू न्यायालयामध्ये भक्कमपणे मांडू न शकल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे, असा आरोप या वेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केला. 

मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीच्या बाबतीत राज्यकर्ते उदासीन आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा संयम संपला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडली असती तर मराठा समाजावर आज ही वेळ आली नसती. केवळ सरकारच्या गचाळपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा सूर मराठा समाजाच्या तरुणांनी बोलून दाखवला. आज शहर कडकडीत बंद होते. एसटी सुविधा बंद केल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली. ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha protesters blocked the road and protested against the government in Mangalwedha