
सोलापूरच्या तिघांचा सहभाग
विश्व साहित्य संमेलनासाठी सोलापुरातून तिघांचा सहभाग यात सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी अरण्यऋषी आणि ज्येष्ठ साहित्यीक मारुती चितमपल्ली यांची घेतलेली मुलाखत रविवार ता. 31 जानेवारी रोजी दुपारी - 12.45 वाजता होणार आहे. मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि पंढरपूरचे कल्याण शिंदे यांचा "साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव' या परिसंवादात सहभाग आहे. हा परिसंवाद गुरुवार ता. 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे.
सोलापूर : विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि 25 देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने 28,29, 30 आणि 31 जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनासाठी नऊ अध्यक्षांचे मंडळ असून ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर या संमेलनाचे महासंमेलनाध्यक्ष आहेत. या संमेलनात सोलापूरधील तीन साहित्यिकांचा समावेश असून महाराष्ट्रांतील विविध लोककला एका क्लिकवर जगाभरात पोहचणार आहेत.
या संमेलनामध्ये एक दिवस स्वतंत्रपणे विश्व मराठी युवा संमेलनही आयोजित करण्यात आले आहे. या जागतिक संमेलनात सोलापूरकरांनीही आपला झेंडा लावला असून सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे, मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि पंढरपूरचे कल्याण शिंदे हे या संमेलनात सहभागी ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा करण्यात आली.
या माध्यमातून 12 कोटी मराठी भाषकांना जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच संमेलन असेल, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटूकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी दिली. या संमेलनामध्ये जगभरातील 32 देशांतून, अमेरिकेतून 40 राज्यांतील, भारतातील 12 राज्यांतील आणि 150 हून अधिक संस्था, पाचशेहून अधिक वाचनालये आणि हजारहून अधिक महविद्यालयांचा सहभाग यामध्ये असेल. तसेच साहित्य, संस्कृती यासोबतच उद्योजकता, लोककला याचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून उत्तर अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकाच्या अध्यक्ष विद्या जोशी संमेलनाच्या महासंरक्षक आहेत. नऊ जणांच्या अध्यक्ष मंडळामध्ये साहित्य विभागाचे अध्यक्ष भारत सासणे, डॉ. विनता कुलकर्णी आहेत. संस्कृती विभागाचे अध्यक्ष सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, उद्योजक विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल कुलकर्णी, युवा विभागाचे अध्यक्ष उमेश झिरपे आणि अजित रानडे आहेत.
संमेलनात 25 देशांमधून 25 स्वागताध्यक्षही आहेत. लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि शहरांमधून 201 प्रतिनिधी या संमेलनाशी जोडले गेले आहेत. संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कविकट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा-कल्पनांचे सादरीकरण, वडिलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा- सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी उपक्रम सादर होतील.
संस्कृती उलगडणार
संस्कृतीची खेडोपाड्यांमध्ये वसलेली पाळेमुळे ही जागतिक स्तरावर पोहोचवण्यास मदत होईल. वैश्विक प्रतिभा संगम यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, पोवाडा, लावणी, वासुदेव, कडकलक्ष्मी, मर्दानी खेळ, एकपात्री कलाकार, सूत्रसंचालक, निवेदक, पोतराज, एकांकिका सादर करणारे, चित्रकार, भटजी (पौरोहित्य करणारे), दशावतार, खेळाडू, गोंधळी, मंगळागौर, नृत्यांगना, धनगरी नृत्य, दंडार, खडी गम्मत, तुंबडी वादक, पालखी, जाखडी, नकटा, लेझिम पथक, ढोल पथक, संबळ पथक याविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संमेलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे.
सोलापूरच्या तिघांचा सहभाग
विश्व साहित्य संमेलनासाठी सोलापुरातून तिघांचा सहभाग यात सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी अरण्यऋषी आणि ज्येष्ठ साहित्यीक मारुती चितमपल्ली यांची घेतलेली मुलाखत रविवार ता. 31 जानेवारी रोजी दुपारी - 12.45 वाजता होणार आहे. मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि पंढरपूरचे कल्याण शिंदे यांचा "साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव' या परिसंवादात सहभाग आहे. हा परिसंवाद गुरुवार ता. 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे.
संपादन : अरविंद मोटे