मतदार यादीवरुन भरली को-मॉर्बिड सर्व्हेची माहिती ! आयुक्‍तांकडून कारणे दाखवा नोटीस

तात्या लांडगे
Saturday, 17 October 2020

शिक्षकांकडून काढून घेतले ऑनलाइन काम 
एप्रिल महिन्यातील सर्व्हेचे अर्ज आता ऑनलाइन अपलोड करण्याचे काम जिजामाता नागरी आरोग्य केंद्रासह अन्य नागरी आरोग्य केंद्राने हाती घेतले आहे. मात्र, बहूतांश अर्जांवर नाही-नाही अशीच नोंद केल्याचा प्रकार जिजामाता नागरी आरोग्य केंद्रात झाला आहे. तर तापमान आणि ऑक्‍सिजन लेव्हलची नोंद अंदाजित भरण्याचा प्रकार साबळे नागरी आरोग्य केंद्रात झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शिक्षक ऑनलाईनचे काम करीत नसल्याच्या तक्रारी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या. त्यावेळी सर्व शिक्षक ऑनलाइन काम वेळेत पूर्ण करतील, असे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी ग्वाही दिली. मात्र, आपण केलेला चुकीचा प्रकार बाहेर येईल म्हणून साबळेसह अन्य नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ऑनलाइन माहिती अपलोड करण्याचे दिलेच नाही, असेही समोर आले आहे.  

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, मृत्यू रोखले जावेत, को-मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरु नयेत, या हेतूने घरोघरी सर्व्हे करण्यात आला. तत्पूर्वी, एप्रिलमधील सर्व्हेची माहिती ऑनलाइन अपलोड करण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. मात्र, सर्व्हेवेळी भरलेल्या अर्जावर नुसती नावेच लिहिली असून त्यासाठी मतदार यादीचा आधार घेतल्याची चर्चा आहे. सर्व्हेत बनावटगिरी अन्‌ सर्व्हेत मागे राहिल्याप्रकरणी जिजामाता, साबळे, मुद्रा सनसिटी आणि भावानाऋषी या चार नागरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आयुक्‍तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

जुळे सोलापूर, विजयपूर रोड, सैफूल, बुधवार पेठ, न्यू पाच्छा पेठ, रेल्वे लाईन यासह अन्य काही भागांमध्ये रुग्ण अद्यापही आढळतच आहेत. शहरातील रुग्णसंख्या आता नऊ हजार 200 झाली असून मृतांची संख्या 512 झाली आहे. त्यात सर्वाधिक को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाला सर्वाधिक बळी ठरल्याचे चित्र आहे. कोरोनापासून अशा व्यक्‍तींना दूर ठेवण्याच्या हेतूने नवी मोहीम राज्यभर सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. तत्पूर्वी, सोलापूर शहरात तीनवेळा सर्व्हे करण्यात आला असून संसर्ग वाढल्याने पुढील टप्प्यात शिक्षकांची मदत घेण्यात आली. तत्कालीन आयुक्‍त दीपक तावरे यांच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या एप्रिलमधील सर्व्हेत बनावटगिरीचा संशय आल्याने शिक्षकांनी आता त्या अर्जातील माहिती ऑनलाइन अपलोड करण्यास विरोध केला. सर्व्हेच्या अर्जात संबंधित घरातील व्यक्‍तींचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल, को-मॉर्बिड रुग्णांचे पूर्वीचे आजार, सद्यस्थितीत खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे आहेत का, याची नोंद करणे अनिवार्य होते. मात्र, बहुतांश अर्जांवर कुटुंबातील व्यक्‍तींची नुसती नावेच असून उर्वरित रकान्यात नाही, नाही असे नमूद करण्यात आल्याचे दिसत आहे.

कारणे प्राप्त झाल्यानंतर निश्‍चितपणे कारवाई 
"माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत शहरात घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती, त्यांचे पूर्वीचे आजार नोंदविणे आवश्‍यक होते. मात्र, अर्ज बनावट भरणे, पारदर्शक सर्व्हे न करणे, वेळेत सर्व्हेचे काम पूर्ण न करणे या कारणावरुन चार नागरी आरोग्य केंद्रांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यांच्याकडून कारणे आल्यानंतर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. 
- पी. शिवशंकर, आयुक्‍त, महापालिका 

शिक्षकांकडून काढून घेतले ऑनलाइन काम 
एप्रिल महिन्यातील सर्व्हेचे अर्ज आता ऑनलाइन अपलोड करण्याचे काम जिजामाता नागरी आरोग्य केंद्रासह अन्य नागरी आरोग्य केंद्राने हाती घेतले आहे. मात्र, बहूतांश अर्जांवर नाही-नाही अशीच नोंद केल्याचा प्रकार जिजामाता नागरी आरोग्य केंद्रात झाला आहे. तर तापमान आणि ऑक्‍सिजन लेव्हलची नोंद अंदाजित भरण्याचा प्रकार साबळे नागरी आरोग्य केंद्रात झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शिक्षक ऑनलाईनचे काम करीत नसल्याच्या तक्रारी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या. त्यावेळी सर्व शिक्षक ऑनलाइन काम वेळेत पूर्ण करतील, असे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी ग्वाही दिली. मात्र, आपण केलेला चुकीचा प्रकार बाहेर येईल म्हणून साबळेसह अन्य नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ऑनलाइन माहिती अपलोड करण्याचे दिलेच नाही, असेही समोर आले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about Co-morbid survey information filled from the voter list