esakal | विषय समित्यांसाठी हात वर करून मतदान ! तौफिक शेख यांचा महेश कोठेंना फोन; भाजप एकाकी 
sakal

बोलून बातमी शोधा

SMC

महापालिकेच्या सात विषय समित्यांच्या सभापतींची निवड 22 डिसेंबरला होणार आहे. कोरोनामुळे एक दिवस अगोदर इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर सभापती निवडीची सभा ऑनलाइन होणार आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक समितीतील नऊ सदस्यांना हात वर करून मतदान करावे लागणार आहे. 

विषय समित्यांसाठी हात वर करून मतदान ! तौफिक शेख यांचा महेश कोठेंना फोन; भाजप एकाकी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी 22 डिसेंबरला होणार आहेत. तत्पूर्वी, महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने भाजपला सोबत घेऊन सर्व निवडी बिनविरोध करण्याचे ठरले होते. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीनंतर महाविकास आघाडीने सर्वच प्लॅन बदलून आता भाजपविरोधात एकत्रित येऊन सर्वच विषय समित्या मिळविण्याचे नियोजन झाले आहे. 

महापालिकेत भाजपचे 49 नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे 21, कॉंग्रेसचे 14, एमआयएमचे नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आणि वंचित बहुजन आघाडीचे तीन नगरसेवक आहेत. भाजपला वगळून महाविकास आघाडीने वंचित आणि एमआयएमची मदत घेतल्यास त्यांच्याकडे पाच मते होतात. दुसरीकडे भाजपकडे चारच मते आहेत. आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून एमआयएमचे सर्वच नगरसेवक महाविकास आघाडीसोबत जाणार, अशी चर्चा आहे. तर वंचित बहुजन आघाडीला एक समिती देऊन सोबत ठेवण्याचेही नियोजन महाविकास आघाडीने केले आहे. 

मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसह शिवसेनेनेही महिला व बालकल्याण समितीवर दावा केला आहे. तर त्याला पर्याय म्हणून स्थापत्य समिती द्यावी, अशीही मागणी आहे. त्यामुळे हा पेच सोडविण्यासाठी भाजप वगळता अन्य पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर महिला व बालकल्याण, उद्यान व मंडई, विधी, स्थापत्य, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य, शहर सुधारणा समिती, कामगार व समाज कल्याण या विषय समित्यांच्या सभापतींची नावे निश्‍चित केली जातील, अशी चर्चा आहे. मात्र, महाविकास आघाडीने घेतलेल्या कलाटणीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने तातडीची बैठक घेतली असून, त्यातील चर्चा व राजकीय समीकरण व आखाडे गुलदस्त्यातच आहेत. 

हात वर करून होणार ऑनलाइन मतदान 
महापालिकेच्या सात विषय समित्यांच्या सभापतींची निवड 22 डिसेंबरला होणार आहे. कोरोनामुळे एक दिवस अगोदर इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर सभापती निवडीची सभा ऑनलाइन होणार आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक समितीतील नऊ सदस्यांना हात वर करून मतदान करावे लागणार आहे. समित्यांच्या निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्‍तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्‍ती केली आहे. महापालिकेचे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्या माध्यमातून विषय समित्यांच्या निवडीचे सर्व नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. 

तौफिक शेख यांचा महेश कोठेंना फोन 
महापालिकेत "एमआयएम'चे नऊ नगरसेवक असून त्यांच्याकडे विषय समित्यांसाठीच्या एकूण नऊ मतांपैकी एक निर्णायक मत आहे. त्यामुळे पक्षातील महिला नगरसेविकेला महिला व बालकल्याण समिती मिळावी, अशी मागणी एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी यापूर्वीच केली आहे. सहा दिवसांवर आता विषय समित्यांच्या निवडी आल्याने दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष असलेल्या शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांना तौफिक शेख यांनी फोन करून भेटीची वेळ घेतली. या बैठकीत एमआयएमची मागणी अधिकृतपणे कळविली जाणार आहे. एमआयएमकडून तस्लिम शेख यांचे नाव आघाडीवर असून, त्यांना आता कोणती समिती मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल