सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालय कोव्हिड हॉस्पिटल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 20 May 2020

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर शहरातील मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व रिसर्च सेंटरचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. हे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून ताब्यात घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढला आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर शहरातील मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व रिसर्च सेंटरचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. हे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून ताब्यात घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढला आहे. 
या रुग्णालयाचा ताबा सोलापूर महापालिकेकडे देण्यात आला आहे. या हॉस्पिटलमधील 200 बेड हे कोव्हिडसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग संपेपर्यंत हे रुग्णालय, संस्थेची इमारत व परिसर, रुग्णालयातील मनुष्यबळ व जीवनावश्‍यक प्रणालीसाठी आवश्‍यक साधनसामुग्री यांचा ताबा महापालिका आयुक्तांकडे असणार आहे. सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या रुग्णालयांमध्ये कोव्हिड हॉस्पिटल संबंधित पर्याप्त व्यवस्था करावी. या संदर्भाने संपूर्ण प्रोटोकॉल पाळले जातील याविषयी रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ माहिती द्यावी. प्रशिक्षण द्यावे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या रुग्णालयात वेळोवेळी भेट देऊन सर्व कार्यपद्धती पालन होत आहे की नाही याची खातरजमा करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या आहेत. रुग्णालयाचे नियोजन व समन्वय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाशी ठेवावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केल्या आहेत. कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, राज्य कामगार विमा हॉस्पिटल यासह सोलापुरातील अनेक महत्त्वाचे हॉस्पिटल कोव्हिडसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Markandey Hospital in Solapur was taken over by the District Collector as Covid Hospital