अदानी व अंबानींच्या प्रतिमा फाडून माकपने केली कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शने !

श्रीनिवास दुध्याल 
Wednesday, 30 December 2020

कार्यकर्ते निदर्शनस्थळी पोचण्याआधी पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त होता. निदर्शनासाठी येणाऱ्या कार्यकर्ते व नागरिकांना हुसकावण्यात आले. काहींची वाहने जप्त केली. यादरम्यान ज्येष्ठ नेते श्री. आडम हे निदर्शनस्थळी पोचताच कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे व निषेधाचे फलक दाखवत घोषणाबाजी केली. 

सोलापूर : जगात कोणतीही वस्तू अथवा जिन्नस उत्पादित करणाऱ्या उत्पादकालाच त्या वस्तूचे भाव ठरविण्याचा मूलभूत अधिकार आहे. शेतकरी वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता निसर्गावर भरवसा ठेवून अन्नधान्य पिकवतो, मात्र त्याचा भाव त्याला ठरविण्याचा अधिकार हिरावून घेणारे कायदे मोदी सरकारने पारित केले. असे शेतकरी विरोधी कायदे अमलात आणणाऱ्या सरकारला जनतेचे सरकार म्हणून मिरविण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल रिलायन्स मार्केटसमोर गौतम अदानी व मुकेश अंबानी यांच्या विरोधात निदर्शने करताना माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला. 

देगाव नाका रिलायन्स मार्केटसमोर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने बुधवारी (ता. 30) सकाळी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केंद्र सरकारविरोधी निदर्शने केली. ही निदर्शने राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 

या वेळी कार्यकर्ते निदर्शनस्थळी पोचण्याआधी पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त होता. निदर्शनासाठी येणाऱ्या कार्यकर्ते व नागरिकांना हुसकावण्यात आले. काहींची वाहने जप्त केली. यादरम्यान ज्येष्ठ नेते श्री. आडम हे निदर्शनस्थळी पोचताच कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे व निषेधाचे फलक दाखवत घोषणाबाजी केली. गौतम अदानी व मुकेश अंबानी यांच्या विविध उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा या वेळी निर्धार करण्यात आला. श्री. आडम व ऍड. एम. एच. शेख यांनी गौतम अदानी व मुकेश अंबानी यांच्या प्रतिमा फाडल्या. 

श्री. आडम पुढे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसून आंदोलनाची तीव्रता लक्षात येऊनसुद्धा त्याकडे हेतुपुरस्सर काणाडोळा करत आहे. याचे तीव्र पडसाद देशभर उमटतील. शेतकऱ्यांसोबत आज सैनिक आणि कामगार खांद्याला खांदा लावून आंदोलनात पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे. अवघ्या काही तासात सबंध देश त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहील आणि असंतोषाची लाट उसळेल. तेव्हा वेळीच सरकारने तीन कृषी विधेयक मागे घेतले पाहिजे; अन्यथा सरकारविरुद्ध जनतेचे युद्ध अटळ आहे. 

या वेळी श्री. आडम यांच्यासह अनिल वासम, युसूफ शेख, सलीम मुल्ला, नसीमा शेख, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ, दाउद शेख, वीरेंद्र पद्मा आदी कार्यकर्त्यांवर फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Markswadi Communist Party agitated against the Agriculture Bill