अन्‌ दोघांच्याही आई- वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला 

रमेश दास 
बुधवार, 8 एप्रिल 2020

पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्‍यातील अंदोरी येथील न्हाने व सेलसुरा येथील पचारे कुटुंबात 6 एप्रिलला लग्न विवाह ठरला होता. परंतु संचारबंदी व लॉकडाउन झाल्यामुळे हा विवाह रद्द होतो की काय ही भीती असताना व लॉकडाउन उठण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुलीचे आई- वडील चिंतित होते.

वाळूज (सोलापूर) : देगाव (वा) (ता. मोहोळ) येथील व सध्या देवळी (जि. वर्धा) पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्यातील माणुसकीमुळे लॉकडाउनच्या काळात अडकलेला विवाह अखेर मोजक्‍याच आठ- दहा लोकांच्या उपस्थितीत व प्रत्येकांत तीन फुटांचे अंतर ठेवून तसेच सर्वांच्या तोंडाला मास्क लावून स्वच्छतेचे व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून अनोख्या पद्धतीने पार पडला. नवरा- नवरीसह दोघांच्याही आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. 
याबाबत पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्‍यातील अंदोरी येथील न्हाने व सेलसुरा येथील पचारे कुटुंबात 6 एप्रिलला लग्न विवाह ठरला होता. परंतु संचारबंदी व लॉकडाउन झाल्यामुळे हा विवाह रद्द होतो की काय ही भीती असताना व लॉकडाउन उठण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुलीचे आई- वडील चिंतित होते. त्यांनी गावातील पोलिस पाटील हेमंत ढोले यांच्याकडे येऊन "लेकीचे लग्न आहे. आता याबाबत काय करावे?' चिंता व्यक्त केली. पोलिस पाटलांनी लगेचच ही बाब देवळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे (मूळगाव देगाव (वा.) ता. मोहोळ) यांच्या पुढाकाराने सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून व संचारबंदीचे उल्लंघन होऊ न देता नवरदेव व नवरीच्या चेहऱ्यावर मास्क लावून विवाह मुहूर्तानुसार ठरल्याप्रमाणे पोलिस चौकीसमोरील प्राथमिक शाळेच्या पटांगणात पार पडला. पूजा शंकर न्हाने (वय 19) व दर्शन कैलास पचारे (वय 25) यांच्या एकमेकांच्या आयुष्यात एकत्र येण्याच्या आनंदाचा क्षण पुढे जातो की काय ही भीती दोन्ही कुटुंबीयांना असतानाच अनोख्या पद्धतीने हा विवाह पार पडला. पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी त्यांना लगेचच त्यांच्या गावी रवाना केले. हा विवाह आई, वडील, सरपंच जयकुमार वाकडे, पोलिस पाटील हेमंत ढोले, सामाजिक कार्यकर्ते सचिन कुराडकर व पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या साक्षीने तीन फुटांच्या अंतरावर उभे राहून पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage due to Deputy Inspector of Police in Solapur District