"मातोश्री' करणार यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप : सिद्धाराम म्हेत्रे 

चेतन जाधव 
Saturday, 24 October 2020

मातोश्री लक्ष्मी शुगरने चालू गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देणार असल्याची घोषणा मातोश्री शुगरचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली. 

अक्कलकोट (सोलापूर) : मातोश्री लक्ष्मी शुगरने चालू गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देणार असल्याची घोषणा मातोश्री शुगरचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली. 

मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा आठव्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे व कार्यकारी संचालक शिवराज म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री. म्हेत्रे बोलत होते. या वेळी गोकूळ शिंदे, भगवान शिंदे, दत्ता शिंदे, माजी उपसभापती विलासराव गव्हाणे, जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, शहराध्यक्ष भीमाशंकर कापसे, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, शिवराज स्वामी, राजकुमार लकाबशेट्टी, शरणप्पा गायगवळी, विश्वनाथ हडलगी, अशोक ढंगापुरे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. तालुक्‍यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून आठव्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. 

श्री. म्हेत्रे म्हणाले, की मागील गळीत हंगाम 2019-20 मध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा करण्यात आले आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे उसाची जोमदार वाढ झाली आहे. त्याचे वेळेवर गाळप करण्याच्या दृष्टिकोनातून कारखाना व्यवस्थापनाने नियोजनबद्ध आखणी केली आहे. तसेच दिवाळी सणानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिवाळी बोनस जाहीर केला आहे. कारखान्याच्या विकासाच्या वाटचालीत तालुक्‍यातील शेतकरी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असून शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. म्हेत्रे यांनी केले. 

या वेळी कारखान्याचे आर. के. गदादे, पी. बी. पवार, के. एल. व्हसुरे, एस. एस. गुरव, एम. डी. गुंड शिरसे आदी शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matoshri Sugars will grind six lakh metric tonnes of sugarcane