कौतुकास्पद ! मयूरीने तयार केलेलं "हे' सॉफ्टवेअर शोधणार आपल्या "हार्ट-बीट'मधील ऍक्‍युरेट सेपरेटर्स 

श्रीनिवास दुध्याल 
Thursday, 21 January 2021

इंडियन सोसायटी फॉर टेक्‍निकल एज्युकेशन (आयएसटीई) आयोजित व लार्सन अँड टुब्रो प्रायोजित एम. टेक. प्रकल्प स्पर्धेत मयूरीने सादर केलेल्या "व्हीएलएसआय' बेस्ड सिस्टीम फॉर प्रेडिक्‍टिंग व्हेंट्रिक्‍युलर अरीथमिया या विषयावरील प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 

सोलापूर : येथील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग ट्रेडच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी मयूरी महेंद्र साळुंके हिने मानवी हृदयाच्या स्पंदनात होणाऱ्या बदलांचे अचूक पृथक्करण करणाऱ्या (Accurate separators of changes in the human heartbeat) व्हीएलएसआय सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. 

इंडियन सोसायटी फॉर टेक्‍निकल एज्युकेशन (आयएसटीई) आयोजित व लार्सन अँड टुब्रो प्रायोजित एम. टेक. प्रकल्प स्पर्धेत मयूरीने सादर केलेल्या "व्हीएलएसआय' बेस्ड सिस्टीम फॉर प्रेडिक्‍टिंग व्हेंट्रिक्‍युलर अरीथमिया या विषयावरील प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 

व्यसनाधीनता, दगदग- धावपळ, जागरण अशा अनेक कारणांनी मानवी जीवनशैलीत बदल होत असून, आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. त्यापैकी हृदयरोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये चिंताजनक वाढ दिसून येते. हृदयरोगाचे मूळ हे हृदयातील होणाऱ्या स्पंदनातील बदलांमुळे होत असते. बदलांचा अंदाज वेळेत आल्यास रुग्णास त्वरित योग्य ते उपचार देऊन पुढील धोका टाळता येऊ शकतो. या दृष्टिकोनातून हृदयरोग्यांसाठी या सॉफ्टवेअरमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच "डब्ल्यूआयटी'च्या विद्यार्थिनीने विकसित केलेल्या व्हीएलएसआय सॉफ्टवेअरचे सामाजिक महत्त्व राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले आहे. 

"व्हीएलएसआय'चे महत्त्व 
या प्रकल्पात रुग्णाचा ईसीजी रियल टाईम इनपुट म्हणून घेतला जातो. या ईसीजी संदेशावर वेगवेगळ्या बॅंडपास फिल्टरमधून प्रक्रिया करून त्यामधील उपयुक्त असे क्‍यूआरएस आणि पीआर भाग वेगळे केले जातात. या वेगळ्या केलेल्या भागांची तुलना ईसीजी डेटाच्या मानक मूल्यांशी केली जाते. यातूनच पुढे धोका उत्पन्न करू शकणाऱ्या असामान्य तरंगांची ओळख होऊ शकते. या तंत्रामध्ये हृदयाच्या स्पंदनांत होणाऱ्या बदलांच्या अंदाजाची अचूकता विविध संश्‍लेषणाद्वारे तपासली जाऊ शकते. या सर्व गोष्टी एकत्र करून त्याची एक व्हीएलएसआय चीप बनविली जाऊ शकते, जी कमी ऊर्जेवर चालू शकेल तसेच भविष्यात ही चीप वापरून विकसित केलेले छोटेसे उपकरण मोबाईल डिव्हाईस म्हणूनही वापरले जाऊ शकते. 

या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मयूरीचे कौतुक केले. या प्रकल्पासाठी डॉ. राजेंद्र दुबे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सचिन गेंगजे, प्रा. अजित गुंडाळे यांनी या सॉफ्टवेअर निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayuri of Solapur develops VLSI which seeks accurate separators of human heart beat changes