स्वच्छता उपकर रद्द करा अन्यथा इंद्रभवनला घेराव घालणार; आडम मास्तरांचा इशारा 

श्रीनिवास दुध्याल 
Saturday, 19 September 2020

स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम केले असून, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अपूर्णच असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. शहरात नागरी सेवा-सुविधांचा अभाव असून कोरोनामुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तरीही महापालिकेने स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपकर रद्द न केल्यास हजारो श्रमिकांना घेऊन इंद्र भवनला घेराव घालणार, असा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला. 

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम केले असून, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अपूर्णच असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. शहरात नागरी सेवा-सुविधांचा अभाव असून कोरोनामुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तरीही महापालिकेने स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता उपकर म्हणजे काय अद्यापही गोरगरिबांना माहिती नाही. हा स्वच्छता उपकर रद्द न केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्‍यात येताच हजारो श्रमिकांना घेऊन इंद्र भवनला घेराव घालणार, असा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला. 

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने माजी आमदार श्री. आडम, ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. 19) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलकांनी स्वच्छता उपकर रद्द करण्याची मागणी केली. मोर्चास श्री. आडम यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, पक्षनेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे आदी पदाधिकारी विलगीकरणात असल्याने माकपतर्फे सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंके यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी श्री. आडम म्हणाले, स्वच्छता व आरोग्य उपविधी हा कर सर्वसामान्य जनता, हॉकर्स, किरकोळ व्यापारी, विक्रेते, झोपडपट्टीधारक व मध्यमवर्गासह अन्य समाज घटकांवर अन्यायकारक आहे. यापूर्वी महापालिकेने युजर्स चार्जेसच्या नावाखाली अनेक ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नसलेल्यांकडूनही पैसे वसूल केले. 

याप्रसंगी नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ शेख, म. हनीफ सताखेड, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, सलीम पटेल, माशाप्पा विटे, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, अशोक बल्ला, दाऊद शेख, नरेश दुगाणे, लिंगव्वा सोलापुरे, अंबादास बिंगी, रवींद्र गेंट्याल, बजरंग गायकवाड, इब्राहिम मुल्ला, युसूफ शेख, किशोर गुंडला, पुष्पा पाटील, भारत पाथरूट, गंगाराम निंबाळकर, प्रशांत चौगुले, वीरेंद्र पद्मा आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The MCP protested against the cleaning cess of Solapur Municipal Corporation