सावधान! चोरी होऊ नये म्हणून पोलिस आयुक्‍तांनी सांगितले 'हे' उपाय 

20200320_120007 (3).jpg
20200320_120007 (3).jpg

सोलापूर : शहरात घरफोडी, काहीतरी सांगून महिलांची फसवणूक अशा घटना वाढू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍तांनी गणेश मंडळे, नवरात्र महोत्सव मंडळे आणि शांतता कमिटीतील सदस्यांनी पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार रात्री 12 ते पहाटे चार या वेळेत त्यांच्या परिसरात गस्त घालावी, असे आवाहन केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरात रात्रीच्या चोरी, घरफोडी अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराचे दरवाजे, कडी कोयंडा मजबूत आहेत का, याची खातरजमा करावी. घराचे दरवाजे नागरिकांनी व्यवस्थीत बंद करून झोपावे, घरातील मौल्यवान, महागड्या वस्तू घरात न ठेवता लॉकरमध्ये ठेवाव्यात, परगावी जाताना नागरिकांनी घरात मोठी रक्‍कम तथा महागडे दागिने ठेवू नयेत, असे आवाहन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. अपार्टमेंट, बंग्लोजमध्ये सर्वांनी सुरक्षिततेसाठी उच्च दर्जाचे सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, भाजीपाला खरेदी तथा नोकरीसाठी जाताना घर बंद केल्याची खात्री करावी, एखाद्या व्यक्‍तीचा तथा महिलेचा संशयास्पद वावर वाटल्यास पोलिसांशी थेट संपर्क करावा. पोलिसांची मदत मिळविण्यासाठी नागरिकांनी 100 क्रमांक, 0217-2744600 आणि 2744620 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

शहरातील दिवसभरातील गुन्हे... 

जुळे सोलापुरात घरफोडी 
सोलापूर : जुळे सोलापुरातील भाग्यश्री पार्क येथील प्रल्हाद प्रकाश मेंथे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने दोन लाख 97 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 28) पहाटे साडेचारच्या सुमारास घडल्याची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली आहे. प्रल्हाद मेंथे हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. तर त्यांचा मोठा भाऊ, आई, आजी, मोठी बहिण हॉलमध्ये झोपल्या होत्या. घरात ओरडण्याचा आवाज आल्याने मेंथे हॉलमध्ये आले. त्यावेळी चोरट्याने घरामागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील दागिने, रोकड, घड्याळ चोरून नेल्याचे त्यांना दिसले. दोन लाख 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 50 हजार रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपयांचे घड्याळ, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

नाकाबंदीवरील कारवाईत घट 
सोलापूर : केंद्र सरकारने ई-पासच्या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदीवरील बंदोबस्त कमी केला आहे. दरम्यान, राज्य परिवहनची बससेवाही सुरू झाली आहे. राज्य सरकारने परजिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची अट कायम ठेवली, असतानाही पोलिसांकडून ठरावीक वाहनांचीच तपासणी केली जात असल्याचे चित्र नाकाबंदीच्या ठिकाणी दिसून येत आहे. शहर हद्दीत आठ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट असून शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी (ता. 29) सकाळी आठ वाजेपर्यंत शहर पोलिसांनी 64 वाहनांवर कारवाई केली. या वाहनांमधील 33 प्रवाशांना होम क्‍वारंटाईन केले. त्यातील काहींना वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

नोकरीच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक 
सोलापूर : लॉकडाउनमुळे पुण्यातील नोकरी सोडून मोहिनी मच्छिंद्रनाथ मोरे या त्यांच्या जुळे सोलापुरातील दिलीपराव माने नगर येथील घरी राहण्यास आल्या आहेत. मार्चपासून त्या नोकरीच्या शोधात होत्या. त्यांनी वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाईटवर जॉबसाठी नोंदणीही केली होती. त्यातून त्यांना बॅंकेत नोकरी असल्याचे सांगून एक लाख 43 हजार 100 रुपयांना फसविल्याची घटना गुरुवारी (ता. 27) घडली. त्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. मोहिनी यांच्या मोबाईलवर अनोळखी महिलेचा कॉल आला. त्यावेळी त्या महिलेने आपण 'शिंदे डॉट कॉम'मधून बोलत असल्याचे सांगितले. एचडीएफसी बॅंकेत फायनान्सियल ऍनॅलिस्ट म्हणून जॉब असून तुम्ही इच्छुक आहात का, अशी विचारणा झाली. त्यानंतर जॉब देण्याच्या बहाण्याने 20 ते 27 ऑगस्ट या काळात समोरील व्यक्‍तींनी विविध कारणे सांगून एक लाख 43 हजार 100 रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करायला लावले. मात्र, नोकरी दिली नसल्याने मोहिनी मोरे यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानुसार अनिता शर्मा, निशांत अग्निहोत्री, रूतिका शर्मा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन मुली झाल्याने विवाहितेचा छळ
सोलापूर : नांदायचे असेल तर माहेरून तीन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. दोन मुलीच झाल्याने तुला नांदविणार नाही, मला सोडचिठ्ठी दे म्हणून विवाहितेला उपाशीपोटी ठेवले, अशी फिर्याद नाजमीन इम्रान शेख (रा. न्यू म्युन्सिपल लेबर क्‍वॉर्टर, अहमदाबाद, सध्या रमाबाई आंबेडकर नगर, पंचशिल चौक) यांनी जोडभावी पोलिसांत दिली. त्यानुसार अनिसा इब्राहिम शेख, इम्रानअहमद इलियास शेख, इलियास अहमद महमदसाब शेख, नफिसा हुजेफा शेख, मुस्ताक महमदसाब शेख, समीन इलियासअहमद शेख यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील भांडणातून मारहाण
सोलापूर : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून रागाने का बघतोस म्हणत अमोल सागरे, प्रशांत साळुंखे, राजाभाऊ निकम, शुभम कराळे यांनी पाईपने मारहाण केली. हाताने व लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करीत डोक्‍यात दारुची बाटली मारली, अशी फिर्याद विकास पांडूरंग शिंदे (रा. मनोहर नगर झोपडपट्टी, निराळे वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यानुसार त्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com