पंढरपुरात सामाजिक संघटना, महाराज मंडळींत का झाली हमरीतुमरी 

भारत नागणे 
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

आज श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने महाराज मंडळी व विविध सामाजिक संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या मुद्‌द्‌यांवर वादळी चर्चा झाली. तथापि कोणताही निर्णय न घेता बैठक स्थगित करण्यात आली. 

पंढरपूर (सोलापूर) : मोफत सुरू असलेले विठ्ठल-रुक्‍मिणीचे ऑनलाइन दर्शन सशुल्क करावे काय या विषयावरून महाराज मंडळी व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत आज मंदिरातच हमरीतुमरी झाली. 
आज श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने महाराज मंडळी व विविध सामाजिक संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या मुद्‌द्‌यांवर वादळी चर्चा झाली. तथापि कोणताही निर्णय न घेता बैठक स्थगित करण्यात आली. 
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत बहुतांश महाराज मंडळींनी ऑनलाइन दर्शन सशुल्क करावे, अशी मागणी केली. दरम्यान, वारकरी पाईक संघटनेच्या काही वारकरी महाराज मंडळींनी सशुल्क दर्शनाला विरोध केला. या वेळी काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वारकरी पाईक संघटनेच्या महाराजांना का विरोध करता, असा जाब विचारला. यातून महाराज मंडळी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत गोंधळ झाला. यातून एकमेकांत हमरीतुमरीही झाली. या वेळी काही ज्येष्ठ महाराज मंडळींनी हस्तक्षेप करून हा वाद सोडवला. शेवटी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सर्व महाराजांशी आणि विविध सामाजिक संघटनांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. सशुल्क दर्शनावरून महाराज मंडळीमध्येच दोन गट पडल्याने यावर काय निर्णय होतो. याकडेच वारकरी महाराज मंडळींचे लक्ष लागले आहे. बैठकीला सदस्य साधना भोसले, शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, केशव महाराज नामदास, राणा महाराज वासकर, रामकृष्ण महाराज वीर, एकनाथ महाराज हंडे, तुकाराम महाराज चवरे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting on Online Darshan in Pandharpur