सांगोल्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा गड अबाधित ठेवणार : भाजपच्या मेळाव्यातील सूर 

दत्तात्रय खंडागळे 
Saturday, 21 November 2020

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा गड आपल्याला अबाधित ठेवायचा आहे. भाजपची काम करण्याची पद्धत अन्य पक्षांपेक्षा वेगळी आहे. उमेदवार कोण आहे हे न पाहता भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले. 

सांगोला (सोलापूर) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा गड आपल्याला अबाधित ठेवायचा आहे. त्यासाठी भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करावयाचे आहे. भाजपची काम करण्याची पद्धत अन्य पक्षांपेक्षा वेगळी आहे. उमेदवार कोण आहे हे न पाहता भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्‍य सांगोला तालुक्‍यातून देणार असल्याचा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केला. 

भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघाचे भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ हॉटेल जोतिर्लिंग येथे भाजपचे पदवीधर व शिक्षक मतदारांचा मेळावा पार पडला. या वेळी भाजपचे पुणे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षकचे उमेदवार जितेंद्र पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार-सावंत, पदवीधरचे जिल्हा संयोजक शशिकांत चव्हाण, आनंद माने, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, विनायक कुलकर्णी, खंडू सातपुते, रयत क्रांती संघटनेचे भारत चव्हाण, रासपचे सोमा मोटे, रावसाहेब साळुंखे, दीपक चव्हाण, नगरसेवक सूरज बनसोडे, विनायक कुलकर्णी, आनंद फाटे, नवनाथ पवार, एन. वाय. भोसले, जयंत केदार, संजय गंभीरे, डॉ. अनिल कांबळे, डॉ. ग. भी. मिसाळ, शिवाजी शेजाळ, दत्ता टापरे, डॉ. विजय बाबर, डॉ. मानस कमलापूरकर, अनिल केदार, सूर्याजी खटकाळे, संजय केदार, शिवाजी ठोकळे, प्रसाद फुले, प्रवीण जानकर, पप्पू पाटील, संतोष पाटील, दिलीप सावंत, तानाजी कांबळे, ऍड. नागेश खर्डीकर, जितेश कोळी, दीपक केदार, राहुल केदार, अमोल लिगाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, पदवीधर व शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना केदार-सावंत म्हणाले, निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली असून संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांना मताधिक्‍य देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्‍य सांगोला तालुक्‍यातून देणार असून भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. 

यावेळी उमेदवार संग्राम देशमुख, जितेंद्र पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगरसेवक सूरज बनसोडे, शिक्षक नेते विनायक कुलकर्णी आदींनीही मनोगते व्यक्त केली. गजानन भाकरे यांनी सूत्रसंचालन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting at Sangola for the campaign of Sangram Deshmukh and Jitendra Pawar