दळभद्री, फालतू, लाचखोर..! प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत झेडपी सभागृहात सदस्यांचा संताप

प्रमोद बोडके 
Tuesday, 19 January 2021

माने यांनी मंत्र्यांबद्दल वापरलेले अपशब्द ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सभेत सदस्य प्रश्न मांडताना अपशब्दाचा सर्रास वापर करत असतानादेखील व्यासपीठावरील पदाधिकारी व अधिकारी काहीच करू शकले नाहीत, हे विशेष. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून बोट ठेवले. निष्क्रियतेवर बोट ठेवत असतानाच सदस्यांच्या तोंडून सभागृहात हरामखोर, दळभद्री, फालतू, लाचखोर आणि टक्केवारी असे शब्द बाहेर पडले. सदस्यांनी पोटतिडकीने प्रश्‍न मांडत असतानाच असंसदीय शब्दांचा केलेला उपयोग सर्वांच्या भुवया उंचावून गेला. 

अक्कलकोट तालुक्‍यातील कृषी विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांनी 36 लाख रुपयांचा अपहार केल्याचा मुद्दा सदस्य आनंद तानवडे यांनी मांडला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पत्र अक्कलकोटच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले असताना देखील अद्यापपर्यंत गुन्हा दाखल का झाला नाही, असा प्रश्न तानवडे यांनी उपस्थित केला. 

जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बेंदगुडे म्हणाले, या प्रकरणी मंत्र्यांनी सूचना दिल्यामुळे ही कारवाई थांबली आहे. जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी आक्रमक होत मंत्र्यांच्या लेखी सूचना आहेत का, असा प्रश्न केला. दिलेल्या सूचना तोंडी असल्याचा खुलासा कृषी अधिकाऱ्यांनी करताच, "हरामखोर मंत्री कोण सांगणार? त्यांनी तोंडी सूचना दिल्यावरही तुम्ही कसे ऐकलात? उद्या ते तुम्हाला काहीही सांगतील, तुम्ही त्यांचे ऐकणार का?' असा सवाल उपस्थित केला. माने यांनी मंत्र्यांबद्दल वापरलेले अपशब्द ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सभेत सदस्य प्रश्न मांडताना अपशब्दाचा सर्रास वापर करत असतानादेखील व्यासपीठावरील पदाधिकारी व अधिकारी काहीच करू शकले नाहीत, हे विशेष. 

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती विजयराज डोंगरे, सभापती संगीता धांडोरे, सीईओ दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, वित्त व लेखाधिकारी अजयसिंह पवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

सीईओ स्वामी म्हणाले, बदमाशी बाहेर काढू 
अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही पाठीशी घालत नाही. ग्रामसेवकांनी केलेल्या अपहाराबद्दल माहिती मागवण्यात आली आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. ज्यांनी बदमाशी केली आहे, त्यांची प्रकरणे आपण बाहेर काढणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या सभेत दिले. 

दोन लाख घेऊन ग्रामसेवकांना नियुक्‍त्या 
अपहार प्रकरणात निलंबित झालेल्या ग्रामसेवकांकडून दोन लाख रुपये घेऊन नियुक्‍त्या केल्या जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी या सभेत केला. जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांनी लाखो रुपयांचा अपहार केला आहे. अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याऐवजी त्यांना सहा महिन्यांपुरते निलंबित करून त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन पुन्हा सेवेत रुजू करून घेतले जात असल्याचा आरोप सदस्य शिंदे यांनी केला. सोलापूरचा ग्रामपंचायत विभाग दळभद्री असल्याचा उल्लेख करत, अपहार करणाऱ्या ग्रामसेवकांना पाठीशी घालणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तोडकर म्हणाले, आम्हाला तुम्ही फालतू समजता का? 
माळशिरस तालुक्‍यातील अर्धवेळ परिचारिकेच्या नियुक्तीचा मुद्दा सदस्य अरुण तोडकर यांनी मांडला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना सीईओ यांनी पाचवेळा सांगितले. मीदेखील पाच वेळा सांगितले, तरी देखील हा प्रश्न मार्गी लागत नाही. तुम्ही आम्हाला काय फालतू समजता का? असा सवाल सदस्य तोडकर यांनी या सभेत उपस्थित केला. खुर्चीत बसून सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देऊ नका, उभे राहून उत्तरे द्या, असे देखील सदस्य तोडकर यांनी डॉ. जाधव यांना सुनावले. 

अनुसूचित जातीसाठी असलेल्या विहीर योजनेतून कृषी विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांनी विहिरीचे काम न करताच अनुदान लाटले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अक्कलकोटच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुनावणी घेत गुन्हा दाखल करण्याचे थांबवावे, असे तोंडी आदेश दिले आहेत. अपहार केल्याचे सिद्ध झाले असतानादेखील कारवाई थांबविणे हे संशयास्पद आहे. 
- आनंद तानवडे, 
जिल्हा परिषद सदस्य 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Members of the Solapur ZP House were angry over the administrations inaction