गतिमंद मुलीवर दुष्कर्म ! पीडितेच्या त्रासानंतर घटना उघड

चंद्रकांत देवकते 
Thursday, 12 November 2020

तालुक्‍यातील एका गावात अल्पवयीन गतिमंद मुलीवर अज्ञात व्यक्तीने दुष्कृत्य केल्याने ती गरोदर राहिली. संबंधित पीडितेला त्रास होऊ लागल्याने ही घटना कुटुंबीयांसमोर उघड झाली. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व दुष्कृत्य केल्याप्रकरणी बुधवारी (ता. 11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यातील एका गावात अल्पवयीन गतिमंद मुलीवर अज्ञात व्यक्तीने दुष्कर्म केल्याने ती गरोदर राहिली. संबंधित पीडितेला त्रास होऊ लागल्याने ही घटना कुटुंबीयांसमोर उघड झाली. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व दुष्कृत्य केल्याप्रकरणी बुधवारी (ता. 11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्‍यातील पेनूर येथे एक कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. त्या कुटुंबामध्ये एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. ही मुलगी गतिमंद असल्या कारणाने लहान मुलांप्रमाणे वागते. या कुटुंबातील इतर व्यक्ती मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर ती मुलगी घरी एकटीच असायची. तिच्या गतिमंदपणाचा 1 जून 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फायदा उचलून तिच्याशी राहत्या घराच्या परिसरात दुष्कृत्य केले. त्यातून संबंधित पीडित अल्पवयीन गतिमंद मुलगी गरोदर राहिली. 

पीडित मुलगी घरात व्यवस्थित जेवण करत नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, तेथील डॉक्‍टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या कुटुंबीयांनी तिला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. 

मजुरीकरिता व कामानिमित्त घराबाहेर असताना अल्पवयीन गतिमंद मुलगी घरी एकटीच असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या एकटेपणाचा व तिच्या गतिमंदपणाचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यामुळे ती गरोदर राहिली आहे, अशा आशयाची फिर्याद पीडित मुलीच्या भावाने मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A mentally retarded girl was tortured by an unknown person at Mohol