पुणे विभागातील महावितरणच्या सहा लाख ग्राहकांनी पाठविले मीटर रिंडीग 

संतोष सिरसट
Monday, 21 September 2020

असे पाठवा मीटर रिडींग 
महावितरण मोबाईल ऍपमध्ये "सबमीट मीटर रिडींग'वर क्‍लिक केल्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मॅन्यूअली रिडींग ऍपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल ऍपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र, गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in संकेतस्थळावरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करायचे आहे, त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्‍यक आहे. 

सोलापूर ः गेल्या पाच महिन्यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यातील सहा लाख नऊ हजार 905 लघुदाब वीजग्राहकांनी स्वतःहून महावितरणकडे मीटर रिडिंग पाठविले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 47 हजार 202 ग्राहकांचा समावेश आहे. त्यातील सात हजार 964 ग्राहकांनी ऑगस्ट महिन्यात मीटर रिडींग पाठविले आहे. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार लॉकडाऊन कालावधीत वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणकडून उपलब्ध करून दिली होती. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून अनलॉकनंतरही ही सोय कायम ठेवण्याची तसेच मीटर रिडींग पाठविण्याची मुदत वाढवून देण्याचे आदेशही डॉ. राऊत यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे रिडींग पाठविण्याची मुदत 24 तासांऐवजी आता पाच दिवस करण्यात आली आहे. 

वीजमीटरचे रिडींग स्वतःहून दरमहा पाठविण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. एप्रिलमध्ये आठ हजार 952, मेमध्ये 11 हजार 906, जूनमध्ये आठ हजार 980, जुलैमध्ये नऊ हजार 400 आणि ऑगस्टमध्ये सात हजार 964 वीजग्राहकांनी स्वतःहून मोबाईल ऍप व महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाद्वारे महावितरणकडे मीटर रिडींग पाठविले आहे. 

महावितरणकडून प्रत्येक महिन्याच्या एक ते 25 मधील एका निश्‍चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. या निश्‍चित तारखेच्या एक दिवसआधी ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची "एसएमएस'द्वारे विनंती दरमहा करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून पाच दिवसांच्या कालावधीत ग्राहकांना मीटरचे केडब्लूएच (kWh) रिडींग व फोटो स्वतःहून पाठविता येईल. विविध फायद्यांसह बिलाची पडताळणी देखील शक्‍य होत असल्याने वीजग्राहकांनी दरमहा स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे आवाहन पुणे प्रादेशिकचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meter rendig sent by six lakh MSEDCL customers in Pune division