स्थायी समितीत "एमआयएम'च किंगमेकर ! भाजपचे डावपेच; विरोधी पक्षनेत्याच्या खांद्यावर नाराजी दूर करण्याची जबाबदारी 

तात्या लांडगे 
Monday, 25 January 2021

स्थायी समितीची निवडणूक साधारणपणे 25 फेबुवारीपर्यंत होईल, असे महापालिका आयुक्‍तांनी सांगितले. बजेट सभा झाल्यानंतर स्थायी समिती निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली गतिमान होणार आहेत. दरम्यान, विषय समित्यांच्या निवडणुकीत तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी महिला व बालकल्याण समिती स्वत:कडे ठेवत कॉंग्रेस व एमआयएमला प्रत्येकी दोन समित्या सोडल्या. तर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक समिती दिली. 

सोलापूर : महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपकडे आठ तर अन्य विरोधी पक्षांकडे आठ मते आहेत. शिवसेनेने या समितीवर दावा केला आहे. परंतु, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेवर नाराजी व्यक्‍त करत स्थायी समिती निवडणुकीत बघून घेण्याची भाषा केली आहे. दुसरीकडे, विषय समित्या निवडीत एकही समिती न मिळालेले एमआयएम अद्याप नाराज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नाराजीचा सूर कानावर पडलेल्या भाजपने डावपेच सुरू केले असून, ही महत्त्वाची समिती मिळविण्यासाठी रणनीती आखायला सुरवात केली आहे. 

स्थायी समितीची निवडणूक साधारणपणे 25 फेबुवारीपर्यंत होईल, असे महापालिका आयुक्‍तांनी सांगितले. बजेट सभा झाल्यानंतर स्थायी समिती निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली गतिमान होणार आहेत. दरम्यान, विषय समित्यांच्या निवडणुकीत तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी महिला व बालकल्याण समिती स्वत:कडे ठेवत कॉंग्रेस व एमआयएमला प्रत्येकी दोन समित्या सोडल्या. तर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक समिती दिली. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे व नगरसेविका अनिता मगर यांनी ऐनवेळी बंडखोरी केली. मगर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन नगरसेवक सदस्यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचा उमेदवार पराभूत झालाच, पण एमआयएमला एकही समिती मिळाली नाही. पराभवाची सल मनात ठेवून एमआयएमच्या नगरसेविका तस्लीम शेख यांनी भाजपला साथ दिली आणि शिवसेनेला धक्‍का दिला. या पराभवाची सल अद्याप एमआयएम विसरलेला नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीत एमआयएमचे नगरसेवक महाविकास आघाडीला साथ देणार का, भाजपला मदत करणार की तटस्थ भूमिकेत राहणार, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

विरोधी पक्षनेत्यांवर "स्थायी'ची जबाबदारी 
शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांचे समर्थक नगरसेवक अद्याप शिवसेनेतच असल्याने महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ दोन नंबरवर कायम आहे. शिवसेनेच्या ताब्यात येणारी स्थायी समितीची निवडणूक तांत्रिक कारणामुळे होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता या समितीच्या सदस्यांची आणि सभापतींची निवड होणार आहे. ही समिती शिवसेनेलाच मिळावी म्हणून पक्षातील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी त्याची जबाबदारी नूतन विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्यावर सोपविली आहे. इच्छुकांची नाराजी दूर करून सभापतिपदाचा उमेदवार निवडण्यापासून कॉंग्रेस व एमआयएमची नाराजी अमोल शिंदे कशाप्रकारे दूर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM will be the kingmaker on the standing committee of Solapur Municipal Corporation