आरोग्याधिकाऱ्यांचे शहरातील 369 रुग्णालयांना आदेश ! फायर ऑडिटचा अहवाल द्या, अन्यथा कारवाई 

तात्या लांडगे 
Monday, 25 January 2021

शहरातील सर्व रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घ्यावे आणि तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी आठ दिवसांपूर्वी काढले. मात्र, अद्याप एकाही रुग्णालयाने अहवाल सादर केलेला नाही हे विशेष.

सोलापूर : शहरात 333 खासगी रुग्णालये असून महापालिकेचे 36 रुग्णालये आहेत. भंडाऱ्यातील नवजात शिशू केअर सेंटरमध्ये आगीची घटना घडल्यानंतर शहरातील सर्व रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घ्यावे आणि तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी आठ दिवसांपूर्वी काढले. मात्र, अद्याप एकाही रुग्णालयाने अहवाल सादर केलेला नाही हे विशेष. 

भंडाऱ्यातील घटनेनंतर शहरातील महिला व त्यांची बालके सुरक्षित राहण्याच्या हेतूने नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी डफरीन रुग्णालयाची पाहणी केली. त्या ठिकाणी इलेक्‍ट्रिक वायरिंग उघड्यावर असल्याचे दिसले तर अग्निविमोचक यंत्रच नसल्याचे समोर आले. तेथील डॉक्‍टरांना जाब विचारताच काही तासांत ते यंत्र बसविण्यात आले. दुसरीकडे, साबळे नागरी आरोग्य केंद्र, बॉईज हॉस्पिटल, भावनाऋषी नागरी आरोग्य केंद्र, रामवाडी, चाकोते, दाराशा आणि जिजामाता या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये तसे यंत्रच नाही. तर वायरिंगदेखील उघड्यावर असून मोकळ्या वायरिंग असल्याची बाब अग्निशामक विभागाने निदर्शनास आणून दिली आहे. 

जानेवारीत महापालिकेच्या आठ प्रसूती केंद्रांमध्ये एक हजार 136 महिलांची प्रसूती झाली असून नऊ हजार 135 गर्भवती महिलांनी नोंदणी केली आहे. त्यात बॉईज, भावनाऋषी, चाकोते आणि जिजामाता प्रसूती केंद्राअंतर्गत सर्वाधिक नोंदणी झाली आहे. दुसरीकडे, शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही दरमहा सुमारे सहा ते आठ हजार महिलांची प्रसूती होते. त्या रुग्णालयांनी फायर ऑडिट करून तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश आरोग्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. अहवाल न देणाऱ्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. दुधभाते यांनी दिला आहे. 

...अन्‌ पालकमंत्र्यांनी फिरदोस पटेल यांचे केले कौतुक 
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 23) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. नगरसेविका फिरदोस पटेल यांनी भंडाऱ्यातील दुर्घटनेवर बोलताना शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट व्हावे, अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री भरणे म्हणाले, या बैठकीतील हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न असून, ही सूचना रास्त आहे. पालकमंत्र्यांनी नगरसेविका पटेल यांचे अभिनंदनही केले. 

रुग्णालयांचे होईल इन्स्पेक्‍शन 
शहरातील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांनी फायर ऑडिट करून त्यासंबंधीचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश काढले आहेत. आता आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयाची पडताळणी केली जाईल. 
- डॉ. बिरुदेव दुधभाते, 
महापालिका आरोग्याधिकारी, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM will be the kingmaker on the standing committee of Solapur Municipal Corporation