दोन दिवसांत पिके व घरांच्या नुकसानीचे करा पंचनामे : आमदार भालकेंची प्रशासनाला सूचना 

हुकूम मुलाणी 
Saturday, 19 September 2020

दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांचे व घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती आमदार भारत भालके यांनी दिली. 

मंगळवेढा (सोलापूर) : दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांचे व घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती आमदार भारत भालके यांनी दिली. 

तळसंगी येथील तीन शाळकरी बालकांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करून रड्डे दौऱ्यावर जात असताना आमदार भालके यांनी ही माहिती दिली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे लतीफ तांबोळी, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे होते. 

आमदार भालके म्हणाले, की सध्या उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे उजनीत जादा झालेले पाणी नदी, कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे. परंतु कालव्याच्या लाभक्षेत्रात अगोदर पाऊस झाला आहे. पावसाचे व कालव्याचे पाणी यामुळे जमीन क्षारपड होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणून कालव्याद्वारे सोडलेले पाणी बंद करून नदीद्वारे सोडण्याच्या सूचना दिल्या असून, मंगळवेढा ते बोराळे, मंगळवेढा ते खोमनाळ, मंगळवेढा ते पाटकळ, मारापूर ते गुंजेगाव, मारापूर ते घरनिकी या गावांदरम्यान असणाऱ्या रस्त्यांवरील पुलाची उंची कमी राहिल्यामुळे पावसाचे पाणी पुलावर जाऊन सध्या ही वाहतूक बंद आहे. पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात सूचना दिल्या असून, मंजूर कामे का प्रलंबित आहेत याची देखील विचारणा संबंधितांकडे करण्यात आली. 

यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा समाधान पावसामुळे पिके जोमात आली. अचानक झालेल्या पावसामुळे पेरू, डाळिंब, द्राक्ष, मका, बाजरी, सूर्यफूल, कांदा, भुईमूग, तूर, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची पिके अजूनही पाण्यात आहेत. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना आता पावसामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आला. हवामान खात्याने आणखीन पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे आमदार भालके म्हणाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhalke instructed the administration to conduct an inquiry into the damage to crops and houses