"सकाळ'मधील बातम्यांकडे असायचे भारतनानांचे लक्ष ! त्याआधारे धरायचे सरकार-प्रशासनाला धारेवर

bhalke
bhalke

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह शेतकऱ्यांचे प्रश्‍न विधानसभेत खणखणीत आवाजात मांडण्यात आमदार (कै.) भारत भालके आघाडीवर राहिले. त्यात "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे विधानसभेपर्यंत नेली व प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा देखील केला. प्रशासनालाही धारेवर धरून प्रश्‍न निकाली लावत असत. 

या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, तालुक्‍यातील सात मंडळांमधील अनेक मंडळांमध्ये दर हेक्‍टरी मिळणाऱ्या भरपाईतील तफावत, गतवर्षी डाळिंब पिकातून मरवडे, भोसे, मंगळवेढा मंडल वगळणे, वृद्धापकाळ योजनेच्या लाभासाठी जुना निकष, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, 2018 च्या खरीप पीक विम्यातून तूर पिकामधील 4012 शेतकऱ्यांना वगळणे, रखडलेली म्हैसाळ योजना कधी मार्गी लागणार, शिरनांदगी तलावात म्हैसाळचे सोडलेले पाणी, तलावातील बंद नंदूर व आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठेकेदार पोसण्यासाठी का?, भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र फिडरची मागणी, वयोवृद्ध कलाकारांचे मानधन, आरोग्य व कृषी खात्यातील रिक्त पदे, तालुक्‍यातील रस्त्यांची दैन्यवस्था, भाळवणीतील रखडलेल्या 132 केव्ही विद्युत सबस्टेशनचा प्रश्न, 33 केव्ही उपकेंद्रासह "महावितरण आपल्या दारी'ची अर्धवट कामे, "उजनी'ची अर्धवट कामे, 2019 मध्ये अतिवृष्टीत नुकसान जास्त व भरपाई कमी, 15 हजार कार्डधारक रेशनविना, ग्रामरोजगार सेवकांचे रखडलेले वेतन, रोहयोची कामे, पीक कर्ज योजनेचा फार्स, राईनपाडा हत्याकांडातील मृत नातेवाइकांचा प्रश्न, रुग्णवाहिका चालकांचे पगार, आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, एसटी महामंडळाच्या प्रश्नांसह रहाटेवाडी पुलाचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांना "सकाळ'ने बातमीच्या माध्यमातून वाचा फोडली होती. 

आमदार (कै.) भालके यांनी या बातम्यांची दखल घेत त्याचा आवाज विधानसभेपर्यंत मांडून त्यासाठी आवश्‍यक इतका निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून गावे व पाणी कमी केल्याचा प्रश्न देखील त्यांनी विधानसभेत सातत्याने आवाज उठवून सरकारला धारेवर धरले. राज्यात सत्ताबदल होताच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्काळ या प्रश्‍नात त्यांनी पाठपुरावा सुरू केला. "सकाळ'मधील बातम्यांद्वारे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे व जनतेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मांडले गेल्यामुळे "सकाळ'च्या प्रत्येक बातमीवर आमदार (कै.) भालके त्यांचे लक्ष असायचे. त्या बातम्यांच्या आधारे त्यांनी विधानसभेत खणखणीत आवाजात सरकारला धारेवर धरण्याचे काम केले. 

जन्म बापाने दिला मात्र समाजात ओळख नानांनी दिली 
(कै.) भालके यांचे स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांना आमदार भालके यांच्या मृत्यूमुळे जबर धक्का बसला आहे. ते "सकाळ'शी बोलताना म्हणाले, जन्म बापाने दिला, पण समाजात ओळख ज्यांनी दिली, तो आमचा देवबाप आम्हाला पोरकं करून गेला. आयुष्यात सर्वाधिक काळ ज्या व्यक्तीसोबत घालवलाय ते आता कायमचे नसणार, या वेदना खूप असह्य होत आहेत. 

भारतनाना हे दररोज सकाळी गाडीत बसले की "सकाळ' वाचत पंढरपूर किंवा मंगळवेढ्याला निघायचे. समाजातील वास्तव आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या बातम्या खूप लक्षपूर्वक वाचायचे. परगावी विशेषत: मुंबईला कामानिमित्त गेल्यावर मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नाबाबत "सकाळ'मध्ये आलेल्या बातम्यांच्या कात्रणांवर नजर ठेवून त्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करत. इतर वेळीदेखील वृत्तपत्रातील बातम्यांवर विशेष लक्ष ठेवून सकाळच्या सत्रात प्रमुख दैनिके वाचून घेत. समाजावर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लिहिले पाहिजे, असा त्यांचा माध्यम प्रतिनिधींकडून आग्रह असायचा. 
- रावसाहेब फटे
आमदार (कै.) भारत भालके यांचे स्वीय सहाय्यक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com