आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक : शरद पवार यांची हॉस्पिटलला भेट 

अभय जोशी
Friday, 27 November 2020

पुण्यातील रुबी हॉल क्‍लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर मंडळी त्यांच्यावर उपचार करत आहेत परंतु आज सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडली. आमदार श्री. भालके यांच्या प्रकृती विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही सातत्याने डॉक्‍टरांशी बोलून विचारपूस करत आहेत.

पंढरपूर : आमदार भारत भालके यांची प्रकृती खूप खूप चिंताजनक बनली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत तथापी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्‍यता खूप कमी आहे, अशी माहिती पुण्यातील रुबी हॉल क्‍लिनिकचे प्रमुख डॉ.ग्रॅंड यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन श्री.भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

आमदार भारत भालके यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बरे झाल्यानंतर एक दिवस ते पंढरपूर येथे आले होते, परंतु पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने पुन्हा पुण्यात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. 

पुण्यातील रुबी हॉल क्‍लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर मंडळी त्यांच्यावर उपचार करत आहेत परंतु आज सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडली. आमदार श्री. भालके यांच्या प्रकृती विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही सातत्याने डॉक्‍टरांशी बोलून विचारपूस करत आहेत.

श्री.भालके यांच्यावर करण्यात येत असलेल्या वैद्यकीय उपचाराविषयी श्री.पवार यांनी मुंबईतील निष्णात डॉक्‍टर आणि पुण्यात सध्या त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्‍टरांची फोनवरुन चर्चा घडवून आणली. त्यानंतर काही वेळातच शरद पवार तसेच अजित पवार या दोघांनी तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर आदींनी रुबी हॉस्पिटल मध्ये समक्ष जाऊन श्री.भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

श्री.पवार हे भेटून गेल्यानंतर दुपारी साडे च्या सुमारास हॉस्पिटल बाहेर श्री.भालके यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे लक्षात घेऊन रुबी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.ग्रॅंड यांनी आमदार श्री.भालके यांच्या प्रकृती विषयी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, श्री.भालके हे व्हेंटीलेटरवर असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक बनली आहे. ऑक्‍सिजन लेव्हल खूप कमी झाली आहे. ते खूप खूप सिरियस झाले आहेत. आम्ही सवर्तोपरी प्रयत्न करत आहोत.परंतु सद्यपरिस्थितीत ते अतिशय क्रिटीकल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्‍यता खूप कमी आहे. 

आमदार श्री.भालके बरे व्हावेत, यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील अनेक कार्यकर्त्यांनी देवांना साकडे घातले असून ठिकठिकाणी मंदिरात प्रार्थना केली जात आहे. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhalke's health is critical: Sharad Pawar's visit to hospital