अतिवृष्टीतील बाधितांना द्यावी त्वरित नुकसान भरपाई : आमदार भालके यांनी दिल्या प्रशासनाला सूचना 

हुकूम मुलाणी 
Saturday, 17 October 2020

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या पडझडीतील नुकसान भरपाईची मदत तातडीने द्यावी व पूर बाधित नागरिकांची उपासमार होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार भारत भालके यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलताना दिल्या. 

मंगळवेढा (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या पडझडीतील नुकसान भरपाईची मदत तातडीने द्यावी व पूर बाधित नागरिकांची उपासमार होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार भारत भालके यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलताना दिल्या. 

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नदीकाठच्या गावांची पाहणी आज आमदार भालके यांनी केली. त्यामध्ये उचेठाण, बठाण, माचणूर, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी या भागातील गावांच्या पाहणी दरम्यान बाधित नागरिकांशी त्यांनी संवाद साधल्यानंतर या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता जितेश वाघमारे, सार्वजनिक व पाटबंधारे विभागाचे अधिकारी भारत बेदरे, ईश्वर गडदे, तानाजी पाटील, सुनील डोके यांच्यासह पूर बाधित नागरिक उपस्थित होते. 

या वेळी आमदार भालके यांनी, नुकसान भरपाई संदर्भातील अडचणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले असून, सध्या नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा 18 ऑक्‍टोबर पर्यंत दिला असल्यामुळे आणखी दोन दिवसांत होणाऱ्या हवामान बदलाची माहिती घेऊन त्यानंतर बाधित पिकांचे व घरांच्या पडझडीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यासंदर्भात पावले उचलली जातील. त्यामुळे कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यातून वगळले जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या व नागरिकांनीदेखील पावसाच्या वातावरणात घराबाहेर न पडता घरात सुरक्षित राहावे. काही अडचणी असतील तर प्रशासन व माझ्याशी संपर्क साधावा, असा आधार पूर बाधित नागरिकांना दिला. 

दौऱ्यातील अधिकाऱ्यांनी बाधित नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर केले असून, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. सुरवातीचे दोन दिवस नागरिकांची व्यवस्था करण्यात गेल्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल. पडझड झालेल्या घर मालकांना चार हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bharat Bhalke suggested immediate compensation to the flood victims