आमदार भालके यांचा मंगळवेढ्यातील "तो' दौरा ठरला अखेरचा ! 

Bhalke Tour
Bhalke Tour

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा - पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे काल (शुक्रवारी) रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबतचे वृत्त समजताच पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघात शोककळा पसरली. मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात आज (शनिवारी) दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. 

गेल्या महिन्यात आमदार भारत भालके यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पुणे येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण त्यानंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्‍यातील अतिवृष्टी झालेल्या उचेठाण, बठाण, माचणूर, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी, सिद्धापूर, अरळी, तांडोर या भागांचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना महसूल प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे सरसकट करण्यात यावे व शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशा सूचना केल्या. प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लक्ष घालण्यासही सांगितले होते. त्यांचा तो दौरा मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांसाठी शेवटचा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तळसंगी, रड्डे, भोसे, मानेवाडी या भागातील मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन देखील केले. परंतु त्रास जाणवू लागण्याने पुन्हा ते रुग्णालयात दाखल झाले. 

नागरिक व कार्यकर्त्यांनी, आमदार भालके आजारातून बरे होण्यासाठी हुन्नूरचा बिरोबा, हुलजंतीचा महालिंगराया, श्री संत दामाजी मंदिर, गैबी दर्गा, लक्ष्मी देवी मंदिर, लक्ष्मी दहिवडी, बागडे बाबा आश्रम आदी देवतांना साकडे घालत त्यांना आजारातून बरे होऊन पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी यावे, असे साकडे घातले होते. मात्र कार्यकर्त्यांची प्रार्थना अपुरी ठरली. त्यांच्या अकाली निधनामुळे गावांमध्ये शोककळा पसरली आहे. 

शिक्षणापेक्षा पस्तीस गावांच्या पाणी प्रश्नावर अधिक अभ्यास केला, असे सांगून पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार भालके यांचा हा प्रयत्न देखील अपूर्ण राहिला. या पाणी प्रश्नामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. ते अडथळे पार करताना प्रसंगी न्यायालयाचा दरवाजाही त्यांनी ठोठावला होता. 

पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळाच्या झळा सोसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना नाकीनऊ येणाऱ्या तालुक्‍याला आतापर्यंत लाभलेल्या आमदारांमध्ये भारत भालके यांची 15 वर्षांची कारकीर्द लक्षात राहणारी ठरली. त्यामध्ये भगिनींच्या डोक्‍यावरील पाण्याच्या हंड्याचा भार कमी करणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही मैलाची दगड ठरली. "पाणी प्रश्नाची निम्मी लढाई जिंकली. आता उर्वरित 35 गावांची लढाई जिंकली म्हणजे मी जनतेला दिलेल्या शब्दातून मुक्त झालो', ही भावना मनात ठेवत त्यांनी पाठपुरावा सुरू केला. परंतु दुर्दैवाने हा पाठपुरावा अखेर अर्ध्यातच राहिला. 

मंगळवेढा आणि पाचवीला पूजलेला दुष्काळ हे समीकरण जणू कायम राहिले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तालुक्‍यामध्ये पिढ्यान्‌पिढ्या भेडसावत असताना तालुक्‍याला उजनीच्या हक्काचे अपेक्षित पाणी मिळत नाही. म्हैसाळचे पाणी तालुक्‍याला मिळत नव्हते. अरळी बंधाऱ्याचे पाणी तेल धोंड्याला, गुंजेगाव बंधाऱ्यातील पाणी 40 धोंड्याला अशा योजना लोकांसमोर मांडल्या; परंतु त्या योजनांची पूर्तता होण्याच्या संदर्भातील अपेक्षित पाठपुरावा होत नव्हता. म्हणून 2009 मध्ये 35 गावातील जनतेने पाण्यासाठी बहिष्कार टाकल्यानंतर ही गावे आणि त्यांचा पाणी प्रश्न राजकीय व्यासपीठावर अधिक प्रमाणात चर्चेला आला. अशा परिस्थितीत पाणी प्रश्नाचे हत्यार हातात घेत आमदार भालके यांनी पाठपुरावा सुरू केला. या भागातील शेतीला पाणी मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा देखील केली.

सुरवातीला 35 गावांना पाणी देण्यासाठी उजनी धरणात पाणी शिल्लक नव्हते, तरीही पाण्याची तरतूद करण्यासाठी त्यांनी वाल्मीकी समिती नेमण्यास भाग पाडून त्यामध्ये पाणी शिल्लक असल्याचे दाखवून दिले. त्यासाठी प्रशासकीय मान्यता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु मागील पाच वर्षात या पाणीप्रश्नामध्ये तत्कालीन भाजप सरकारने अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावला लागला. शेवटी राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र देण्यास भाग पाडले. मागील सरकारने यामधील गावे आणि पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला. राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताबदल झाला. या सत्ताबदलाचा लाभ घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेत सर्व गावे या योजनेत समाविष्ट होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू केला. उजनीतून तालुक्‍याला मिळणारे पाणी पूर्ण मिळावे यासाठी रखडलेल्या कामासाठी निधी प्राप्त करून घेतला. लाभ क्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळण्यासाठी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहिले. 

सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने पाणी प्रश्‍नासाठी सातत्याने विधानसभेत आवाज उठवत अखेर म्हैसाळचे पाणी तलावात आणत केलेल्या पाठपुराव्याचे समाधान मानत त्यांनी पाणी पूजनाचे श्रेय शिरनांदगीच्या महिला सरपंच भगिनींना दिले. पाणी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडत विरोधी पक्षांशी घरोबा केला. त्या वेळी "जोपर्यंत मी जनतेच्या मनात आहे तोपर्यंत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास व दिलेल्या शब्दाला मी बांधील आहे', या भूमिकेत जनतेच्या सुख-दु:खात जनतेबरोबर राहिल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नेते बरोबर नसतानाही केवळ जनतेच्या पाठबळावर आमदारकीची हॅट्ट्रिक मिळविली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com