
तालुक्यातील गोणेवाडी येथील घराजवळील शेततळ्यात संरक्षक तार कंपाउंड नसल्यामुळे दोन लहान बालकांचा एकमेकांना वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे येथील रखमाजी मासाळ यांचे कुटुंबीय लेकरांविना पोरके झाले. अशा अवस्थेत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांचे सांत्वन केले.
मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच धास्ती घेतली. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या परिचारक कुटुंबीयांनी सुधाकरपंत परिचारक या ज्येष्ठ नेत्याला गमावला. आता या विळख्यातून बाहेर पडत तालुक्यातील गोणेवाडी येथे मृत मासाळ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आमदार प्रशांत परिचारक हे समाजकारणात सक्रिय झाले.
परिचारक कुटुंबीय मंगळवेढा, पंढरपूर आणि माळशिरस या तीन तालुक्यांतील विविध शिक्षण संस्था, सहकारी संस्था, बॅंकांच्या माध्यमातून अनेक व्यक्ती व कुटुंबांशी सातत्याने संपर्कात असतात. अशातच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्यामध्ये प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करूनही परिचारकांचे कुटुंब त्यातून सुटले नाही. सुधाकरपंतांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक कोरोनाच्या विळख्यात सापडले. ते कोरोनावर मात करू शकले नाहीत. इतरांनी त्यावर मात केली. परिचारकांना मानणारा वर्ग मोठा असून युटोपियन व पांडुरंग परिवारात पसरलेल्या नैराश्याच्या वातावरणाला सावरून त्याला धीर देण्याची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्यावर येऊन पडली होती. त्यामुळे त्यांनी कोरोनावर मात करत हळूहळू लोकांमध्ये सक्रिय होण्यास सुरवात केली.
तालुक्यातील गोणेवाडी येथील घराजवळील शेततळ्यात संरक्षक तार कंपाउंड नसल्यामुळे दोन लहान बालकांचा एकमेकांना वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे येथील रखमाजी मासाळ यांचे कुटुंबीय लेकरांविना पोरके झाले. अशा अवस्थेत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांचे सांत्वन केले. या वेळी जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, नामदेव जानकर आदी उपस्थित होते.
ब्रह्मपुरी येथील पाटील कुटुंबीयांचेही आमदार परिचारक यांनी सांत्वन केले. कोरोनाला सोबत घेऊन जगताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे, हे आता स्पष्ट झाले असून, आमदार परिचारक तालुक्यात सक्रिय झाल्यामुळे समर्थक सुखावले आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल