esakal | आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ! हाथरस प्रकरणात योगी अदित्यनाथ यांनी द्यावा राजीनामा 
sakal

बोलून बातमी शोधा

Praniti Shinde

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या...

सोलापूर : हाथरस (उत्तर प्रदेश) येथे दलित समाजातील तरुणीवर सामुहिक अत्याचार झाला. त्या तरुणीच्या मृत्यूनंतरही तिला व तिच्या कुटुंबाला सन्मान मिळाला नाही. आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मोदी सरकार काळात महिलांवर अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. केंद्र सरकारकडून अशा प्रकरणातील आरोपींवर तत्काळ कारवाई होत नसल्यानेच अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. 

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ! हाथरस प्रकरणात योगी अदित्यनाथ यांनी द्यावा राजीनामा 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : हाथरस (उत्तर प्रदेश) येथे दलित समाजातील तरुणीवर सामुहिक अत्याचार झाला. त्या तरुणीच्या मृत्यूनंतरही तिला व तिच्या कुटुंबाला सन्मान मिळाला नाही. आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मोदी सरकार काळात महिलांवर अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. केंद्र सरकारकडून अशा प्रकरणातील आरोपींवर तत्काळ कारवाई होत नसल्यानेच अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. 


शहरात असावीत 
19 आरोग्य केंद्रे 

सोलापूर : शहरातील 2011 मधील लोकसंख्या गृहीत धरून सोलापुरात 15 नागरी आरोग्य केंद्रे करण्यात आली. मात्र, आता शहराचा विस्तार वाढला असून लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे सर्वच नागरीकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 19 नागरी आरोग्य केंद्रांची गरज आहे. त्यामुळे वाढीव नागरी आरोग्य केंद्रास सरकारने मान्यता द्यावी, असे पत्र महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिले आहे. सरकारच्या मान्यतेनंतर जुळे सोलापूर, विडी घरकूल परिसरात (पूर्व भाग) आरोग्य केंद्रे सुरु करता येणार आहेत, असेही आयुक्‍त शिवशंकर म्हणाले. 


एटीएम कार्ड घेऊन 
23 हजारांची फसवणूक 

सोलापूर : अशोक चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतून दोन अनोळखी तरुणांनी हातचलाखी करून माझ्याकडील एटीएम घेतले. एटीएममधून संमतीविनाच 23 हजार रुपयांची रक्‍कम काढून लंपास केली, अशी फिर्याद किरण गणपतराव बिसले (रा. तारांगण निवास, एकता नगर, वालचंद कॉलेजमागे) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानंतर त्या दोघांनी एटीएमद्वारे 13 हजार 188 रुपयांची खरेदीही केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे हे पुढील तपास करीत आहेत.

शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई 
सोलापूर : शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर सात पोलिस ठाण्याअंतर्गत दंडात्मक कारवाईची मोहीम सातत्याने सुरु आहे. 17 ऑगस्टपासून शहर पोलिसांनी दहा हजारांहून अधिक वाहनांसह विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातून पोलिसांनी नऊ लाख 27 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आज (सोमवारी) 89 वाहनांवर व 202 विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याकडून 20 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 


बेशिस्त नागरीकांना 
40 हजारांचा दंड 

सोलापूर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत कारवाई केली जात आहे. शहरातील आठ झोन कार्यालयाअंतर्गत ही कारवाई दररोज सुरु असून त्याचा नियमित आढावा आयुक्‍त कार्यालयाकडून घेतला जात आहे. आतापर्यंत आठ झोन कार्यालयांपैकी झोन क्रमांक दोनमध्ये सर्वाधिक नऊ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वैद्यकीय तपासणीसाठी जाताना अडवणूक 
सोलापूर : जेवण देण्याच्या कारणावरून सात रस्ता परिसरातील खान चाचा हॉटेलसमोरील मारहाणीत वाहतूक पोलिस शिपायाच्या पायाचे हाड मोडले. तर या मारहाणीत खान यांच्या मुलालाही मारहाण झाली. त्याच्या अंगावरील वळ नेमके कोणाच्या मारहाणीचे आहेत, याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी संशयित आरोपी सलमान म. शफी खान, रिहान म. शफी खान यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घेऊन जाताना त्यांच्या नातेवाईकांनी बेकायदा जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणातील दोघांना घेऊन जाताना संशयित आरोपींच्या मित्र व नातेवाईकांनी बेकायदा जमाव जमविला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जायचे नाही, आमचीही तक्रार घ्या, त्याशिवाय तुम्हाला जावू देणार नाही म्हणून निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी संशयित आरोपींना पोलिसांच्या वाहनात बसविताना प्रतिकार केला. त्यांच्या अटकेला अटकाव करुन पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सलमान खान याने माझीही तक्रार घ्या, नाहीतर मी आत्महत्या करीन म्हणून नातेवाईकांसोबत फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. शिंदे करीत आहेत. 


दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी 
खान चाचा हॉटेलसमोरील मारहाणीत वाहतूक पोलिस अमोल बेगमपुरे यांच्या पायाचे हाड मोडले. त्यानंतर सदर बझार पोलिसांत सलमान म. शफी खान, रिहान म. शफी खान यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्या दोघांना आज जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.