esakal | अतिवृष्टीतील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधितांना करा मदत : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

Ranjitsinh Mohite Patil

अतिवृष्टीने बाधित गावातील पंचनामे ताबडतोब करा. बाधितांना अन्नधान्य, वीज यासह रस्ते, पूल, बंधारे दुरुस्तीची कामे सुरू करून सर्वतोपरी मदत करा आदी सूचना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिल्या. 

अतिवृष्टीतील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधितांना करा मदत : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील 

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : अतिवृष्टीने बाधित गावातील पंचनामे ताबडतोब करा. बाधितांना अन्नधान्य, वीज यासह रस्ते, पूल, बंधारे दुरुस्तीची कामे सुरू करून सर्वतोपरी मदत करा आदी सूचना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिल्या. 

येथील शिवरत्न बंगल्यावर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावातील नागरिक, पदाधिकारी व विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला. या बैठकीस माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक भगवान निंबळकर, उपअभियंता एस. बी. केदार, पाटबंधारेचे अमोल मस्कर, जलसंधारण अधिकारी ए. जी. इंगळे, चंद्रकांत सकट, रूपेश गावीत, महावितरणचे महेश निकम आदी उपस्थित होते. 

या अतिवृष्टीमुळे माळशिरस तालुक्‍याच्या पिलीव, शिंगर्णी, बचेरी, सुळेवाडी, शेंडेचिंच, कुसमोड, धानोरे, काळमवाडी, कोळेगाव, फळवणी, मळोली, दसूर, तोंडले, बोंडले, खळवे या गावांतील सुमारे 650 कुटुंबातील अडीच हजार नागरिक बाधित झाले आहेत. या गावातील अनेक घरे, जनावरांचे गोठे व शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. सुमारे 950 हेक्‍टर जमिनीवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. सिमेंट बंधारे, पाझर तलाव, केटिवेअर आदींचे नुकसान झाले आहे. अनेक रस्त्यांवरून अजूनही पाणी वाहत असून अनेक पूल वाहून गेले आहेत. अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. 

या वेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे महेश निकम यांनी, अतिवृष्टीमुळे 1365 ट्रान्स्फॉर्मला बंद तर 224 विजेच्या खांबांचे नुकसान झाले आहे. सुमारे 17 हजार 550 लोकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. आम्ही येत्या दोन दिवसात सर्व वीजपुरवठा पूर्ववत करू, अशी ग्वाही दिली. 

अतिवृष्टीमुळे बाधित सर्व गावांचा सर्व्हे करण्यासाठी 26 पथके करण्यात आल्या असल्याचे सांगून, प्रांताधिकारी शमा पवार म्हणाल्या, सध्या बाधित कुटुंबांना गहू, तांदूळ व डाळ या वस्तू तातडीने देत आहोत. तसेच भांडीकुंडी व कपडे घेण्यासाठी पाच हजार रोख मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवून मदत लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. 

या वेळी तरी मदत मिळेल का? 
गतवर्षी नदीला आलेल्या पुराने बाधित असलेल्या खळवे गावातील बाधितांपैकी सुमारे 159 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्याच शेतकऱ्यांचे आता अतिवृष्टीने पुन्हा नुकसान झाले आहे. गतवर्षी पुराने तर यावर्षी अतिवृष्टीने सर्वस्व हिरावून घेतलेल्या शेतकऱ्यांनी या वेळी तरी मदत मिळेल का, असा उद्विग्न प्रश्न उपस्थित केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल