बार्शी नगरपालिकेची 35 कोटी थकबाकी ! कर भरण्याचे आमदार राऊत यांनी केले आवाहन 

प्रशांत काळे 
Saturday, 17 October 2020

केंद्र आणि राज्य शासनाने मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू केला. मागील सात महिन्यांत बार्शीकर नागरिकांना पालिकेचा कर भरण्यास तगादा लावला गेला नाही. शासनाने टप्प्या-टप्प्याने सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यास परवानगी दिली असून, पालिकेची 35 कोटी रुपये थकबाकी आहे. नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

बार्शी (सोलापूर) : केंद्र आणि राज्य शासनाने मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू केला. मागील सात महिन्यांत बार्शीकर नागरिकांना पालिकेचा कर भरण्यास तगादा लावला गेला नाही. शासनाने टप्प्या-टप्प्याने सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यास परवानगी दिली असून, पालिकेची 35 कोटी रुपये थकबाकी आहे. नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

आमदार राऊत म्हणाले, लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार, व्यापार ठप्प झाले होते. प्रत्येकाला कुटुंबाची चिंता होती. त्यामुळे पालिकेने नागरिकांना घरपट्टी-पाणीपट्टी भरण्यास तगादा लावला नाही. पण पालिका विकासकामे कशी करणार, असा प्रश्न यापुढे निर्माण होणार आहे. मागील दोन वर्षांत शासनाचा निधी वेळोवेळी मिळवून विकासकामे साध्य केली आहेत. यापुढे शहरातील रस्ते, विविध विकास कामांना तांत्रिक मंजुरी मिळाल्या आहेत. पण कामे सुरू करण्यास पैशाअभावी अडचणी निर्माण होणार आहेत. कोरोनामुळे शासनाकडून निधी येण्यास उशीर लागणार आहे. आजपर्यंत नागरिकांनी पालिकेस सहकार्य करून वेळोवेळी मदत केली आहे. नागरिकांच्या अडचणी असतील तर त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती द्यावी. त्यांचे निराकरण करून समस्या सोडवल्या जातील. 

नागरिकांनी आजपर्यंत पालिकेचा कर भरण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर राहून ठसा उमटवला आहे. शहरातील ऑक्‍सिजन पार्क, गणेश तलाव, संकेश्वर उद्यान, व्यापारी संकुल ही कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच विस्तारीत भागातील गटारी, रस्ते, दिवाबत्ती ही कामे करायची आहेत. त्यासाठी आर्थिक अडचण भासणार असून, प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाने नागरिकांचे प्रबोधन करून पालिकेचा कर भरण्याविषयी प्रबोधन करण्यास सांगितले आहे, असेही आमदार राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले. 

पत्रकार परिषदेस मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगराध्यक्ष असिफ तांबोळी उपस्थित होते. त्यांनीही नागरिकांना पाणीपट्टी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Raut appeals to citizens to cooperate by paying taxes of Barshi municipality