शेतकरी बांधवांनो, दक्षता घ्या !-आमदार संजय शिंदे यांचे आवाहन 

अण्णा काळे 
Monday, 7 December 2020

बिबट्यासंबंधीची सत्य परिस्थिती वनविभाग व पोलिस विभागाला कळवावी व प्रशासनाला सहकार्य करावे. सध्या सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर व उस्मानाबाद येथील वन विभागांचे सहकार्य बिबट्या पकडण्यासाठी घेतलेले आहे. बिबट्या जोपर्यंत जेरबंद होत नाही तोपर्यंत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आमदार संजय शिंदे यांनी केले आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील लिंबेवाडी व अंजनडोह या दोन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अफवा पसरवू नयेत, एखादी माहिती आपल्याला मिळाल्यावर ती सत्य आहे का? याची शहानिशा करावी त्यानंतरच ती पुढे पाठवावी, असे आवाहन आमदार संजय शिंदे यांनी केले आहे. 

आमदार संजय शिंदे यांनी बिबट्यापासून काय काळजी घ्यावी, यासाठी करमाळा येथे प्रमुख अधिकाऱ्यांसह तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व वनविभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. या वेळी ते नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी धैर्यशील पाटील, वनरक्षक संजय कडू, तहसीलदार समीर माने यांनीही नागरिकांनी बिबट्यापासून स्वसंरक्षणासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. 

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तानाजी झोळ, सुजित बागल, उद्धव माळी, अशपाक जमादार, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आमदार संजय शिंदे म्हणाले, बिबट्यासंबंधीची सत्य परिस्थिती वनविभाग व पोलिस विभागाला कळवावी व प्रशासनाला सहकार्य करावे. सध्या सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर व उस्मानाबाद येथील वन विभागांचे सहकार्य बिबट्या पकडण्यासाठी घेतलेले आहे. बिबट्या जोपर्यंत जेरबंद होत नाही तोपर्यंत नागरिकांनी खबरदारी घ्यावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Shinde has appealed to take precaution against leopards