सिद्धेश्‍वर यात्रेबाबत आमदार शिंदे, 'देवस्थान'तर्फे पोलिस आयुक्तांना आराखडा सादर ! दोन दिवसांनंतर पुन्हा बैठक 

अमोल व्यवहारे 
Friday, 25 December 2020

सिद्धेश्‍वर यात्रेबाबत गुरुवारच्या बैठकीमध्ये देवस्थान पंचकमिटी व आमदार शिंदे यांनी कमीत कमी भक्‍तांमध्ये व संपूर्णपणे काळजी घेऊन ही यात्रा कशा पद्धतीने धार्मिक वातावरणात पार पाडता येईल याबाबत पोलिस आयुक्‍त यांना आराखडा दिला. या वेळी यात्रेबाबत विस्तृत चर्चा होऊन दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक घेऊन त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेण्याचे ठरले. 

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेबाबतचा निर्णय दोन दिवसांनंतर पुन्हा बैठक घेऊन घेऊ, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेण्याबाबतचे आश्‍वासन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिले असल्याची माहिती सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा ही काही ठराविक भक्‍तांच्या सान्निध्यात पार पडावी, यासाठी सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून आराखडा देण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे सर्वाधिकार हे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिलेले होते. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या कक्षात आमदार प्रणिती शिंदे, सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, इतर पदाधिकारी व पोलिस अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. 

या बैठकीमध्ये देवस्थान पंचकमिटी व आमदार शिंदे यांनी कमीत कमी भक्‍तांमध्ये व संपूर्णपणे काळजी घेऊन ही यात्रा कशा पद्धतीने धार्मिक वातावरणात पार पाडता येईल याबाबत पोलिस आयुक्‍त यांना आराखडा दिला. या वेळी यात्रेबाबत विस्तृत चर्चा होऊन दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक घेऊन त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीला ऍड. मिलिंद थोबडे, बाळासाहेब भोगडे, कोनापुरे, माळगे, शिवकुमार पाटील आदी उपस्थित होते. 

यात्रा सोलापूरकरांची, यासाठी राजकारण करू नये 
मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार गुरुवारी पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्याकडे बैठक झाली. यात्रा काळात संचारबंदी लावू नये, भक्‍तांनीही गर्दी न करता आपल्या व इतरांच्या जीवाच्या संरक्षणासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आमदार संजय शिंदे हे देखील या यात्रेबाबत पाठपुरावा करीत असल्याबाबत विचारले असता, "ही यात्रा सोलापूरकरांची असून यासाठी राजकारण करू नये. यात्रेबाबत आपल्याला पाहिजे तसा निर्णय मिळाला असून आपण आपल्यापरीने यात्रेसाठी प्रयत्न करीत आहोत', असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

देवस्थान पंचकमिटीने यात्रेबाबत त्यांचे म्हणणे बैठकीत मांडले असून, त्यावर प्रशासन निर्णय घेईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी करून त्याचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासन योग्य ते नियोजन करून, समन्वय साधून हा सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर 

शासन दरबारी बुधवारी झालेल्या निर्णयानुसार यात्रा व्हावी की नाही याबाबतचे सर्वाधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरुवारी झालेल्या पोलिस आयुक्‍तांच्या बैठकीत देवस्थानकडून आराखडा देण्यात आला आहे. कमीत कमी भक्‍तांमध्ये, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी योग्य त्या प्रकारे काळजी घेऊन यात्रा घेण्याबाबतची मागणी करण्यात आली. परंतु, प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे यात्रा पार पाडण्यासाठी पंचकमिटीचे प्रशासनास सहकार्य राहील. 
- धर्मराज काडादी, 
अध्यक्ष, सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटी 

प्रशासनाने योगदंड व पालखीला परवानगी दिलेली आहे. 68 नंदीध्वज मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही. प्रत्येक नंदीध्वजासोबत केवळ 25 नंदीध्वजधारक आणि काही ठराविक पदाधिकारी-भक्‍तगण यांना प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा बैठक होऊन नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक होणार आहे. 
- राजशेखर हिरेहब्बू, 
सिद्धेश्‍वर महाराज यात्रा प्रमुख मानकरी व पुजारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Shinde and Devasthan Panch Committee presented the plan to the Commissioner of Police regarding Siddheshwar Yatra