नुकसानग्रस्तांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत द्या, अन्यथा राज्य सरकारविरोधात आक्रोश मोर्चा ! मनसेचा इशारा

भारत नागणे 
Tuesday, 20 October 2020

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. अशा संकट काळात राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. अशा संकट काळात राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. धोत्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. 

आधीच दुष्काळ, कोरोना या आपत्तीमुळे शेतकरी कर्जात बुडलेला असतानाच पुन्हा नैसर्गिक आपत्तीमुळे तो पूर्णपणे खचला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वनिधीतून शेतकऱ्यांना तातडीची प्रती हेक्‍टर 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांना पुन्हा लागवडीसाठी बी-बियाणे आणि खतांचे वाटप करावे, असेही निवेदनात नमूद केले आहे. 

मागील चार ते पाच दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मंडळींचे पाहणी दौरे सुरू आहेत. त्यांच्या पाहणी दौऱ्यातून शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी पाहणी केली आहे. त्यांनी आता वाट न पाहता मदत जाहीर करावी. ग्रामीण आणि शहरी भागात मायक्रो फायनान्स आणि बचत गटाकडून घेतलेले कर्ज देखील शासनाने माफ करावे, अशी मागणीही श्री. धोत्रे यांनी केली आहे. 

सोमवारी (ता. 19) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पंढरपुरात आले होते. त्यांनाही श्री. धोत्रे यांनी लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे. 

राज्य शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करावी; अन्यथा राज्यभरातील प्रत्येक तहसील कार्यालयावर मनसेच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला आहे. 

या वेळी उद्योगपती अभिजित पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, मोहेंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष हणमंत मडके, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण कोळी, शहर अध्यक्ष सिद्धश्वर गरड, नगरसेवक अंबादास धोत्रे, महेश 
पवार, नागेश इंगोले, अमोल पुजारी, प्रथमेश पवार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS demanded Rs 50 thousand per hectare for the victims