सण-उत्सव उसाच्या फडातच साजरा करावा लागणाऱ्या ऊसतोड महिला मजुरांना मनसेने दिली संक्रांतीची भेट 

भारत नागणे 
Friday, 15 January 2021

राज्याच्या विविध भागांतून ऊस तोडणी मजूर सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत आले आहेत. मजुरांना सणवार आणि उत्सव उसाच्या फडातच साजरे करावे लागतात. दिवाळीसारखा मोठा सण देखील त्यांना छोट्याशा खोपटात आणि उसाच्या फडातच साजरा करावा लागतो. 

पंढरपूर (सोलापूर) : ऊस तोडणीच्या कामासाठी आलेल्या महिला भगिनींचा मकर संक्रांतीचा सण उत्साहात आणि गोड व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊसतोड करणाऱ्या महिलांच्या झोपड्यांवर जाऊन त्यांना साडी- चोळीचा आहेर भेट दिला व तिळगूळ वाटप केले. मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून स्वागत व कौतुक केले जात आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पंढरपूर व मोहोळ भागातील ऊसतोड महिला मजुरांना संक्रांतीची ही भेट देण्यात आली. 

राज्याच्या विविध भागांतून ऊस तोडणी मजूर सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत आले आहेत. मजुरांना सणवार आणि उत्सव उसाच्या फडातच साजरे करावे लागतात. दिवाळीसारखा मोठा सण देखील त्यांना छोट्याशा खोपटात आणि उसाच्या फडातच साजरा करावा लागतो. 

सुवासिनी महिलांचा आनंदाचा आणि उत्सावाचा मकर संक्रांती सण देखील सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, पिढ्यान्‌ पिढ्या उसाच्या शेतात काम करणाऱ्या सुवासिनी महिलांना देखील मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी मनसेच्या वतीने ऊसतोड करणाऱ्या महिलांना तिळगूळ वाटप करून त्यांना साडी- चोळीचा आहेरही या निमित्ताने भेट म्हणून देण्यात आला. 

मनसेने राबवलेल्या या आगळ्या आणि सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी समाजातील उपेक्षित आणि गरजू लोकांना यापूर्वीही लॉकडाउनच्या काळात मोठी मदत करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. मकर संक्रांतीनिमित्तही त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून गरीब व गरजू ऊसतोड मजूर महिलांना छोटीशी भेट देऊन मायेचा आधार दिला. त्यांच्या उपक्रमाचे महिला मजूर वर्गातूनही स्वागत केले जात आहे. या वेळी तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, मोहोळ तालुका उपाध्यक्ष श्री. शेळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS gives Makar Sankranti gift to sugar cutter women workers