"अधिवेशनामध्ये घरगुती व शेतीपंपाचे संपूर्ण वीजबिल माफीची घोषणा करावी; अन्यथा मनसेचे आंदोलन !' 

भारत नागणे 
Saturday, 6 March 2021

दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच फळांचे व इतर शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी मनसेचे प्रदेश सचिव दिलीप धोत्रे यांनी केली. 

पंढरपूर (सोलापूर) : दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच फळांचे व इतर शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे संपूर्ण वीजबिल माफ करावे. राज्य सरकारने अधिवेशनामध्ये वीजबिल माफीची घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सचिव तथा शॅडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी केली. 

सिद्धेवाडी (ता. पंढरपूर) येथे मनसे शाखेचे उद्‌घाटन दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी शेतकरी प्रश्नासंबंधी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. श्री. धोत्रे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून राज्यातील सर्वसामान्य मजूर वर्ग व शेतकरी कोरोनाच्या सावटाखाली जीवन जगत आहे. अशा संकट काळात देखील शेतकरी इमानेइतबारे कष्ट करीत आहेत. मागील काही वर्षांपासून दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी उद्‌ध्वस्थ झाला आहे. त्यातच आता केंद्र सरकाने नव्याने लागू केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी आणि त्यांचा शेती व्यवसाय मोडला आहे. तर दुसरीकडे वाढत्या इंधन दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. अशातच शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. केंद्र आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. 

शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारलाही आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकरी अडचणीत असताना वीज बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज तोडली आहे. मनसे शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. शेतकऱ्यांना केवळ तात्पुरता दिलासा देऊन चालणार नाही तर त्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपूर्ण वीजबिल माफ करावे. अधिवेशनामध्ये राज्य सरकारने तशी घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येतील. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचवण्यात येतील. राज ठाकरे जो आदेश देतील तो शिरसावंद्य असेल, असेही दिलीप धोत्रे यांनी विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातील मनसेची भूमिका स्पष्ट केली. 

या वेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शाखा अध्यक्ष स्वप्नील जाधव, विक्रम तिकुटे, सज्जन मस्के, नवनाथ कोळी, सागर गोडसे, अक्षय मोरे, आदिनाथ कोळी, समाधान मस्के, राज जाधव, संग्राम जाधव, आकाश जाधव, वैभव जाधव, ओंकार गोडसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The MNS in Pandharpur is demanding cancellation of the entire electricity bill of domestic and agricultural pumps