'मनसे'चा 'चंद्रभागा आपल्या दारी' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन 

भारत नागणे
Thursday, 3 September 2020

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न 
दरवर्षी चंद्रभागेच्या पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. यामुळे नदीचे प्रदुषण होते. त्यातून लोकांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होते. नदीपात्रात अस्वच्छता निर्माण होते. नदीचे प्रदूषण कमी व्हावे आणि कोरोनाचा संसर्ग देखील कमी व्हावा. यासाठी मनसेनेच्या वतीने चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवला. यामध्ये दहा हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त गणेश उत्सव साजरा व्हावा हिच आमची भूमिका होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 
- दिलीप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस, मनसे 

पंढरपूर (सोलापूर) : चंद्रभागा नदीचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यंदा गणेश विसर्जनासाठी चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवला. या पर्यावरणपूरक उपक्रमाला शहरातील गणेशभक्तांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. अनंद चतुदशीच्या दिवशी जवळपास दहा हजार गणेशमूर्तींचे मनसेने तयार केलेल्या चंद्रभागा पाण्याच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. मनसेच्या प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमाचे राज्यभरातील पर्यावरण प्रेमींनी कौतुक केले आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा गणेश उत्सव सर्वत्र साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. दहा दिवसाच्या गणेश उत्सवामध्ये नागरिकांनी देखील प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांततेत आणि तितक्‍याच भक्तीमय वातावरणात गणेश उत्सव साजरा करुन आदर्श गणेशभक्तीचे दर्शन घडवले. 
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी चंद्रभागा आपल्या दारी या उपक्रमातून शहरातील गणेशभक्तांना गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सोय उपलब्ध करुन दिली होती. 30 विसर्जन रथ तयार केले होते. या रथामध्येच चंद्रभागेच्या पाण्याचे कृत्रिम तलाव तयार केले होते. दिवसभर सुमारे दहा हजाराहून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे या रथामध्ये विसर्जन करण्यात आले. 
त्यानंतर निर्माल्य आणि गणेशमूर्तीचे विधीवत मोठ्या शेततळ्यातील पाण्यात विसर्जन करण्यात आले. मनसेच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमामुळे येथील चंद्रभागानदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करण्यास मदत झाली आहे. दरवर्षी शहरातील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन चंद्रभागानदी पात्रात केले जाते. रासायनिक रंग आणि प्लॉस्टर ऑफ पॅरिसरच्या गणेशमूर्तीमुळे चंद्रभागेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. यंदा मात्र मनसेच्या चंद्रभागा आली आपल्या दारी या उपक्रमामुळे चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे. प्रर्यावरण प्रेमींकडून देखील मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. 
 

तर नदी प्रदूषणमुक्त होईल 
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कॉपर, चुना व विविध रासयनिक रंगाचा वापर केला जातो. गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन केल्यामुळे नदीचे जवळपास दरवर्षी 70 ते 80 टक्के प्रदुषण होते. यावर्षी पंढरपूर येथील मनसे आणि नगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करुन त्यामूर्ती विसर्जन केले. त्यामुळे चंद्रभागेचे प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे. दरवर्षी असे उपक्रम राबवले तर नदी प्रदूषणमुक्त होईल. 
- अरविंद कुंभार, पर्यावरण प्रेमी, सोलापूर 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS undertakes immersion of ten thousand Ganesh idols in an artificial lake