केत्तूरची शान वाढवणारे मोबाईल टॉवर ठरताहेत कुचकामी ! रेंज गुल; ऑनलाइन शिक्षणासह इतर व्यवहारही ठप्प 

Mobile Towers
Mobile Towers

केत्तूर (सोलापूर) : केत्तूर (ता. करमाळा) परिसरातील गावाची शान वाढवणारे मोबाईल टॉवर हे सध्या कुचकामी ठरत असून, मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊनही नाहक त्रास सहन करण्याची वेळ मोबाईल ग्राहकांवर आली आहे. त्यामुळे ग्राहक वर्ग मात्र संताप व्यक्त करीत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून केत्तूरसह परिसरातील केत्तूर नंबर एक, पोमलवाडी, पारेवाडी, हिंगणी, दिवेगव्हाण, गोयेगाव, खातगाव, गुलमोहरवाडी, भगतवाडी आदी गावांत मोबाईल सेवेचे "तीन-तेरा'च वाजले आहेत. व्यवस्थित मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. मोबाईल हा प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईलशिवाय कोणतेही काम होत नाही, असेच चित्र सर्वत्र आहे. परंतु नेटवर्कच (रेंज) मिळत नसल्याने कामे ठप्प होत असून, मोबाईल ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. पैसा जाऊनही काम होत नसल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. 

ग्राहक दिवसाला दीड जीबी, दोन जीबी डेटासह तीन महिन्यांचं सरासरी रिचार्ज करतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून नेटवर्कच "गुल' होत असल्याने केलेल्या रिचार्जचे पैसे वाया जात आहेत. याकडे संबंधित अधिकारी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ग्राहक मात्र भरडला जात असून, त्याची शुद्ध फसवणूक होत आहे. सध्या परिसरात जिओ तसेच आयडिया कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने कॉल कनेक्‍ट न होणे, खरखर आवाज येणे, मोठ्या आवाजात बोलावे लागणे, फोन लागूनही आवाज न जाणे किंवा न येणे, मोबाईलमधून पैसे मात्र कट होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे संवाद साधताना अडचणी येत आहेत. त्यातच इंटरनेट तर दिवस दिवसभर बंद राहात असल्याने संकटात भर पडत आहे. 

पैसे भरूनही मोबाईल कंपन्या व्यवस्थित सेवा देत नसल्याने ग्राहकांना नेटवर्क मिळवण्यासाठी उंचावर जावे लागत आहे. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे अद्यापही शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. परंतु इंटरनेट चालू होत नसल्याने याचा फटका विद्यार्थी वर्गालाही बसत आहे. विद्यार्थ्यांची अवस्था मात्र "इकडे आड अन्‌ तिकडे विहीर' अशी झाली आहे; तर इंटरनेट बंद पडत असल्याने बॅंका, पोस्ट तसेच इतर कार्यालयांनाही त्याचा फटका बसत आहे. तरी परिसरातील मोबाईल सेवा त्वरित पूर्ववत सुरळीत करावी, अशी मागणी मोबाईल ग्राहकांनी केली आहे. 

केत्तूर मोबाईल ग्राहक नितीन सलगर म्हणाले, मोबाईलवरून ऑनलाइन बिले भरण्यापासून ते बहुतेक आर्थिक व्यवहार करण्यास इंटरनेट चालत नसल्याने ब्रेक बसत आहे. 

केत्तूर येथील शिक्षक भीमराव बुरुटे म्हणाले, सध्या मोबाईलवर झूम ऍपद्वारे सर्व वर्गांचे तास घेतले जातात. पण गेल्या कित्येक दिवसांपासून मोबाईलला नेटवर्क नीट मिळत नाही. त्यामुळे तास घेताना अडचणी निर्माण होतात. या अडचणी त्वरित दूर झाल्या पाहिजेत. 

केत्तूरचे पालक सचिन जरांडे म्हणाले, सध्या शाळा नाही पण ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्चून मुलांसाठी स्मार्टफोन घेतला. पण नेटवर्क नसल्यामुळे सुरू असलेल्या शिक्षणातही खंड पडू लागला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून नेटवर्कची अडचण त्वरित दूर व्हावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com