esakal | सोशल मीडियावरील शुभेच्छा संदेशांच्या वर्षावाने मोबाईल हाउसफुल्ल ! 
sakal

बोलून बातमी शोधा

social_media

प्रबोधनात्मक, पाश्‍चात्त्य तसेच देशी कल्पकतेने नवनवीन प्रकारच्या आकर्षक शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर झाल्याने दिवाळीच्या शुभेच्छांनी मोबाईल मात्र "हाउसफुल्ल' झाले आहेत. 

सोशल मीडियावरील शुभेच्छा संदेशांच्या वर्षावाने मोबाईल हाउसफुल्ल ! 

sakal_logo
By
राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : प्रबोधनात्मक, पाश्‍चात्त्य तसेच देशी कल्पकतेने नवनवीन प्रकारच्या आकर्षक शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर झाल्याने दिवाळीच्या शुभेच्छांनी मोबाईल मात्र "हाउसफुल्ल' झाले आहेत. 

दिवाळीच्या सणामध्ये पाहुणेरावळे, मित्रपरिवार यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जातात. काही वर्षांपूर्वी ग्रीटिंग कार्ड, पोस्टकार्डद्वारे सणाच्या शुभेच्छा पाठविण्याची प्रथा होती. परंतु काळ बदलला व मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग झाला, तशी शुभेच्छांचे क्षेत्रही बदलत गेले. 

मात्र यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रथमच प्रत्यक्ष गाठीभेटी, एकत्र फराळ, तसेच गर्दी करून उत्सव साजरे करण्यावर मर्यादा व बंधने आली. यावर उपाय म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच सण- उत्सवांचे शुभेच्छा संदेश इन्स्टंट तयार करून ते देवघेवीचा पर्याय अवलंबला जात आहे. मात्र यामुळे मेसेज, व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌विटर, ई-मेल, इन्स्टाग्राम अशा माध्यमातून शुभेच्छांची रेलचेल सुरू आहे. शुभेच्छा संदेशामध्ये फोटो, व्हिडिओ तसेच गिफ्ट मेसेज यांचा सर्रास वापर केला जात असल्याने मोबाईल इनबॉक्‍स मात्र शुभेच्छांनी भरून गेले असून ते हाउसफुल्ल झाले आहेत. 

युवक म्हणतात... 
या वर्षी "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो' अशा पारंपरिक शुभेच्छांसह आधुनिक शब्दांचा वापर करून नानाविध, काल्पनिक शुभेच्छांचा भरणा जास्त होता. 
- गणेश शेंडगे, केत्तूर 

काही शुभेच्छांमध्ये सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षितता घेण्यासंदर्भात, आवश्‍यक त्या सूचनाही देण्यात येत होत्या. 
- नितीन सलगर 

काही शुभेच्छा कार्टूनच्या माध्यमातून देण्यात आल्या तर काही शुभेच्छांमध्ये स्वतःचे फोटो व्हिडिओमध्ये तयार करून शुभेच्छा देण्यात आल्या. 
- पायल कटारिया 

सध्याच्या आधुनिक काळात पोस्टकार्ड, ग्रीटिंग कार्डद्वारे शुभेच्छा देण्याचा जमाना इतिहासजमा झाला आहे व सर्वांकडेच मोबाईल असल्याने सर्वजण मोबाईलवरच शुभेच्छा देण्यास पसंती देत आहेत. 
- श्वेता शिंदे, कुंभेज 

काळानुसार बदल हा अपेक्षित असतो तसा बदल होतोय. पद्धती त्याच आहेत मात्र शुभेच्छा देण्यासाठीचे मार्ग वेगवेगळे झालेत. मात्र नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये किंवा हितसंबंधांमध्ये असणारा गोडवा तोच कायम आहे. 
- अमरसिंह खाटमोडे-पाटील 

कोरोना काळामुळे यंदा दिवाळीसाठीचा म्हणावा तसा लोकांनी जल्लोष न करता पर्यावरणपूरक, प्रदूषण न होता दिवाळी साजरी केली. त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला. त्याने खूपच बदल घडवून आणला. 
- राहुल इरावडे 

लोकांनी प्रत्यक्ष बाजारपेठेतून खरेदी न करता ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच यंदा खरेदी करून आपल्या आप्तेष्टांना ऑनलाइनच वस्तू गिफ्ट केल्या. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी न होता कोरोनाच्या संसर्गास काही प्रमाणात का होईना आळा बसला. 
- उदय माने 

संपादन : श्रीनिवास दुध्याल