चिमणीसोबतच महापालिकेच्या रडारवर मोबाईल टॉवर, महापालिका धाडणार नोटीस

प्रमोद बोडके
Thursday, 22 October 2020

"उडान' अशक्‍य, उड्डाण शक्‍य 
होटगी रोड वरील विमानतळावरून केंद्र सरकारच्या उडान योजनेतील विमाने उतरविण्यासाठी रन-वेचीही मोठी अडचण आहे. या योजनेतील विमानांना आवश्‍यक असलेला रन-वे उपलब्ध नाही. त्यामुळे "उडान' योजना या ठिकाणी तुर्तास शक्‍य नाही. परंतु सध्या असलेल्या रन-वे च्या माध्यमातून विमाने उतरविण्यासाठी व उड्डाण करण्यासाठी कसलाही अडथळा नाही. होटगी विमानतळाशेजारील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हा विमान उड्डाणासाठी अडथळा आहे. मागील काही वर्षात हा अडथळा दूर न झाल्याने केंद्र सरकारच्या "उडान' योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यात सोलापूरचा समावेश झाला नाही. कारखान्याची चिमणी हटवल्यानंतर त्या ठिकाणी 40 ते 80 सीटर विमाने उतरू शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

सोलापूर : सोलापुरातील होटगी रोड येथील विमानतळावरुन विमानसेवेसाठी अडथळा ठरणाऱ्या सिध्देश्‍वर कारखान्याच्या चिमणीसोबतच आता मोबाईल कंपनीचे दोन टॉवर महापालिकेच्या रडारवर आले आहेत. विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या दोन मोबाईल टॉवरला तत्काळ नोटीस काढा असा आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. 

होटगी रोडवरील विमानतळावरुन विमान सेवेला असलेल्या 18 अडथळ्यांवर आज महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीत माहिती घेतली. या शिवाय विमानतळाच्या जागेवर झालेले अतिक्रमण, विमानतळात साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा या मुद्यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली. महापालिका प्रशासन व विमानतळ व्यवस्थापकांच्या बैठकीत आयुक्त पी. शिवशंकर यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. 

या बैठकीला एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे संतोष कौलगी, बोरामणी येथील विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, सहाय्यक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, सहाय्यक अभियंता शांताराम आवताडे व महापालिकेचे विभागिय अधिकारी उपस्थित होते. विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या दोन मोबाईल टॉवरसोबतच इमारतींनाही नोटीस बजावण्यात येणार आहे.

या मोबाईल कंपन्यांनी त्यांचे टॉवर दहा ते पंधरा दिवसात स्वतःहून इतर ठिकाणी शिफ्ट करावेत अन्यथा महापालिकाही टॉवर हटवेल अशी नोटीस बजावण्यात येणार आहे. विमानतळाच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलिस संरक्षण घेऊन कार्यवाही करावी अशी सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत केली. दरम्यान सिध्देश्‍वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेने पाठवलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile tower on the radar of the corporation along with the chimney, the corporation will issue a notice