मोहिते-पाटील घराण्याला अखेर न्याय मिळाला

 The Mohite-Patil family finally got justice
The Mohite-Patil family finally got justice

नातेपुते (सोलापूर) : विधान परिषद निवडणुकीसाठी आज भाजपतर्फे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव, युवक नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

माळशिरस विधानसभा, माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला दणदणीत विजय देणाऱ्या मोहिते-पाटील यांना कधी न्याय मिळणार, अशी चर्चा सुरू होती. रणजितसिंह यांच्या उमेदवारीच्या रूपाने मोहिते-पाटील घराण्याला भाजपने अखेर न्याय दिला असल्याची भावना व्यक्त होत आहे.


सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून संपूर्ण मोहिते-पाटील परिवाराला भाजपची साथ सोबत करायला भाग पाडले होते.

रणजितसिंह मोहिते-पाटील हे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी तालुका पातळीपर्यंत किमान आठ ते दहा वेळा दौरा करून पक्षाची बांधणी केली होती. संपूर्ण राज्यात त्यांचा चाहतावर्ग आहे. हे लक्षात घेऊन व सहकार क्षेत्रातील मोहिते-पाटील परिवाराचे काम पाहून भाजपने त्यांचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार मोठ्या फरकाने विजय करण्यात मोहिते-पाटील कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघ त्यांनी भाजपकडे खेचून आणला आहे. विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजपच्या दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांचे मतपरिवर्तन केले होते.


गेली 10 वर्षे मोहिते-पाटील कुटुंबातील व्यक्ती विधानसभा, विधान परिषदेत कार्यरत नव्हती. त्यामुळे आता विजयसिंह यांच्याप्रमाणेच रणजितसिंह यांच्याकडूनही लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण माळशिरस तालुक्‍यात व सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. 


ग्रामीण आणि सहकारातील चेहरा 
तब्बल 10 वर्षांनंतर मोहिते-पाटील कुटुंब राज्यातील राजकारणात पुन्हा नव्या जोमाने सक्रिय होणार आहेत. भाजप संघटना बांधणीसाठी त्यांचा उपयोग करून घेईल, यात शंका नाही. ग्रामीण व सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा चेहरा म्हणून मोहिते-पाटील यांच्याकडे पाहिले जाते. (कै.) वसंतदादा पाटील, सहकारमहर्षी (कै.) शंकरराव मोहिते-पाटील यांच्या गटाला भाजपने राजकीय ताकद दिल्याचे या निवडीने स्पष्ट झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com