राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्याकडून जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

योग्य निर्णय घेऊ 
आमदार यशवंत माने यांच्यावर कारवाईची मागणी करणारे निवेदन मला मिळाले आहे. निवेदन पहिल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. 
- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर 

मोहोळ (जि. सोलापूर) : लॉकडाउनच्या काळात जिल्हाबंदीचा आदेश असताना मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी शासकीय नियम धाब्यावर बसवून आदेशाची पायमल्ली केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, त्यांना आहे त्या ठिकाणी क्वारंटाइन करावे, अशी मागणी भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
सध्या लॉकडाउन असून सर्वत्र जिल्हाबंदीचे आदेश लागू आहेत. असे असताना मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी मंगळवारी (ता. 12) पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून सोलापूर जिल्ह्यात येऊन मोहोळ तालुक्‍यातील पाटकूल, सावळेश्‍वर या गावांना भेटी दिल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी अशाच भेटी दिल्या आहेत. त्या ठिकाणी शासकीय अधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने स्वतःची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा स्थलांतरित झाल्यानंतर 14 दिवस क्वारंटाइन होणे गरजेचे आहे. केवळ आपण लोकप्रतिनिधी आहोत या दबावाखाली कायदा धाब्यावर बसवून आमदार माने यांनी जनता व प्रशासनाला वेठीस धरून कोरोनाबाधित ठिकाणी बैठका घेतल्या आहेत. जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 
दरम्यान, मला निवेदन मिळाले आहे. निवेदन पाहून पुढे काय करायचे, याचा निर्णय घेणार आहे, असे आमदार यशवंत माने यांनी सांगितले. तसेच कारवाईच्या मागणीचे निवेदन आपल्याला मिळाले आहे. निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ते जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, असे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mohol constituencys NCP MLA Mane violates district ban