मोहोळ शिक्षण विभाग सज्ज ! उद्यापासून वाजणार 138 शाळांची घंटा 

राजकुमार शहा 
Tuesday, 26 January 2021

शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशाप्रमाणे बुधवार, 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केलेल्या "माझे गाव कोरोनामुक्त गाव' अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

मोहोळ (सोलापूर) : उद्या (ता. 27) पासून मोहोळ तालुक्‍यातील 138 शाळांची घंटा वाजणार असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभाग सज्ज झात्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी दिली. "माझे गाव कोरोनामुक्त गाव' या अभियाना अंतर्गत कोरोना व मतदार दिनानिमित्त गावोगावी प्रभात फेरी काढून शिक्षकांद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. 

शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशाप्रमाणे बुधवार, 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केलेल्या "माझे गाव कोरोनामुक्त गाव' अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत कोरोनाचे नियम पाळत मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करत सर्व शासकीय - निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, शिक्षक व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. कोरोनासंबंधी प्रतिबंधात्मक पंचसूत्री असलेल्या सूचनांचे फलक व घोषणा देत गावातील नागरिकांना मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत होते. मतदार दिनानिमित्त व कोरोनाचे सर्व नियम पाळण्याबाबत उपस्थित गावकऱ्यांना शपथ देण्यात आली. या वेळी पापरीचे ग्रामसेवक अनंत नकाते, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ, शिक्षिका, शिक्षक वृंद, पोलिस पाटील प्रशांत पाटील, आरोग्य सेविका, तसेच सुरेश भोसले प्रशालेचे शिक्षक आदी उपस्थित होते. 

उद्या (बुधवार) पासून जिल्हा परिषदेच्या 70, खासगी अनुदानित 62, स्वयं अर्थसहाय्य एक, खासगी विनाअनुदानित एक, आश्रम शाळा 3, शासकीय आश्रम शाळा 1 अशा 138 शाळांची घंटा वाजणार आहे. यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. 468 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी श्री. निंबर्गी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mohol Education Department has made all the preparations as the school will start from Wednesday