मोहोळ तालुक्‍याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे ! रुग्णांची संख्या आली शंभरीच्या आत 

राजकुमार शहा 
Friday, 4 December 2020

मोहोळ शहरासह ग्रामीण भागात गेल्या नोव्हेंबर अखेरपर्यंत एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही शंभराच्या आत आहे तर संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्‍याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर यांनी दिली. 

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहरासह ग्रामीण भागात गेल्या नोव्हेंबर अखेरपर्यंत एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही शंभराच्या आत आहे तर संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्‍याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर यांनी दिली. मात्र, सध्याच्या थंडीच्या लाटेत वयस्कर नागरिकांसह अन्य नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मोहोळ तसा सोलापूर शहरापासून जवळचा तालुका. शासकीय कर्मचाऱ्यांसह अन्य नागरिकांची विविध कामानिमित्त सोलापूर शहराला ये-जा सुरू असते. त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. आरोग्य विभागासह महसूल, पंचायत समिती आदी विभागांनी कोरोना उच्चाटनासाठी प्रयत्न केले. गावोगावी नागरिकांचे प्रबोधनही केले, तसेच नागरिकांच्या प्राथमिक स्वरूपातील रॅपिड अँटिजेन व अन्य चाचण्याही करण्यात आल्या. तहसीलदार जीवन बनसोडे, तत्कालीन गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पात्रुडकर, सध्याचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी प्रयत्न करून नागरिकांचे प्रबोधन करून कोरोनाबाबतच्या चाचण्या करण्यास नागरिकांना भाग पाडले. 

मोहोळ तालुक्‍यात आतापर्यंत 85 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र गेल्या महिन्याअखेरपर्यंत एकही मृत्यू नाही. शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या तालुक्‍यात नागरिकांच्या विविध चाचण्या कमी झाल्या आहेत. किमान 50 हजार तरी चाचण्या होणे अपेक्षित आहे. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, कॅन्सर अशा व्याधी असलेल्या नागरिकांनी चाचण्या करून घेणे बंधनकारक असल्याचे डॉ. पात्रुडकर यांनी सांगितले. यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. 

मोहोळ तालुक्‍याची कोरोनाबाबतची स्थिती 

  • मोहोळ शहरात बाधित रुग्ण : 341 
  • ग्रामीण भागात बाधित रुग्ण : 1408 
  • शहरातील बरे झालेले रुग्ण : 310 
  • ग्रामीण भागातील बरे झालेले रुग्ण : 1271 
  • आरटीपीसीआर झालेल्या चाचण्या : 3500 
  • रॅपिड अँटिजेन टेस्ट : 19 हजार 
  • तालुक्‍यातील मृत्यू : 85 
  • तालुक्‍यात उपचार घेत असलेले रुग्ण : 84 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohol taluka is on its way to Corona free Due to Less of patients