मोहोळ तालुक्‍यात दुपारी दोनपर्यंत पदवीधरसाठी 40.95 तर शिक्षकसाठी 72.66 टक्के मतदान 

राजकुमार शहा 
Tuesday, 1 December 2020

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्‍यात आज होत असलेल्या मतदानात मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले. पदवीधरसाठी दुपारी दोन वाजेपर्यत 40.95 टक्के तर शिक्षकासाठी 72.66 टक्के मतदान झाले. 

मोहोळ (सोलापूर) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्‍यात आज होत असलेल्या मतदानात मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले. राजकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीला स्वरूप आल्याचे दिसत होते. दरम्यान, पदवीधर उमेदवाराच्या मतदान प्रक्रियेसाठी गर्दी दिसून आली, तर त्या तुलनेत शिक्षक उमेदवाराच्या मतदानासाठी फारशी गर्दी दिसून आली नाही. पदवीधरसाठी दुपारी दोन वाजेपर्यत 40.95 टक्के तर शिक्षकासाठी 72.66 टक्के मतदान झाले. 

गेल्या 17 नोव्हेंबरनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर राजकीय निवडणुकीप्रमाणे स्थानिक राजकीय पक्षांचे नेते वरिष्ठांच्या सांगण्यावरून कामाला लागले होते. तालुक्‍यातील वरिष्ठ नेत्यांनी गाव तसेच तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांवर मतदार आणून त्यांचे मतदान करून घेण्याची जबाबदारी सोपविली होती. विविध राजकीय नेत्यांनी यात सहभाग घेतल्याने कार्यकर्ते मतदान केंद्रापासून लांब अंतरावर बसून परिस्थितीची पाहणी करत होते. तसेच एखाद्या मतदाराला अडचण येऊ नये म्हणून कार्यकर्ते मतदार याद्या घेऊन बसले होते. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या निवडणुकीप्रमाणे मंडपही उभारण्यात आले होते. सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा सुरू असल्याचे दिसून आले. 

दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्राबाहेर आरोग्य विभागाचे कर्मचारी मतदान करणाऱ्या मतदारांची ऑक्‍सिजन, थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करूनच मतदानासाठी मतदान केंद्रात सोडत होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळ व शेटफळ येथील मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत पोलिस निरीक्षक अशोक सायकर, तहसीलदार जीवन बनसोडे होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mohol taluka voting for graduates and teachers union is going on peacefully